मुंबई : वृत्तसंस्था
आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा निराशाजनक पराभव मुंबई इंडियन्सने १३ एप्रिल रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर १२ धावांनी केला. या सामन्यांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल संतापलेला आणि स्पष्टपणे नाराज दिसून आला. त्याने पराभवाचे खापर थेट मधल्या फळीतील फलंदाजांवर फोडत, खराब शॉट सिलेक्शनला जबाबदार ठरवले.
मुंबई इंडियन्सन् प्रथम फलंदाजी करत २०६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. सामना दिल्लीच्या पकडीत असतानाच करुण नायर बाद झाला आणि त्यानंतर संपूर्ण डाव कोसळला. कर्ण शर्मा आणि मिशेल सँटनर यांच्या यशस्वी गोलंदाजीने मुंबईने सामन्यात जोरदार पुनरागमन केले.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अक्षर पटेलने स्पष्टपणे सांगितले की, हा सामना आम्ही सहज जिंकू शकत होतो. पण मधल्या फळीतील काही फलंदाजांनी बेजबाबदार शॉट्स खेळले. अशा सामन्यात प्रत्येक वेळेस खालच्या फळीतील खेळाडू सामना वाचवतील अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे.
त्याने पुढे सांगितले की, केवळ १२ धावा बाकी असताना आमच्याकडे एक षटक शिल्लक होते. या क्षणाला संयमाने खेळणे गरजेचे होते. पण काही चुकीचे निर्णय आणि शॉट्समुळे सामना हातून निसटला.
गोलंदाजांचे कौतुक, झेल चुकल्याबद्दल खंत
अक्षर पटेलने करुण नायरच्या इम्पॅक्ट सब म्हणून कामगिरीचं कौतुक केले. त्याचप्रमाणे, क्षेत्ररक्षणातील चुका आणि झेल गाळल्याबद्दल खंतही व्यक्त केली. जर झेल गाळले गेले नसते, तर आम्ही कदाचित २०५ची जागा १८०-१८५ मध्ये रोखू शकलो असतो, असे त्याचं म्हणणे होते. फिरकी गोलंदाजांविषयी बोलताना तो म्हणाला की, माझ्या ताफ्यात तीन चांगले फिरकीपटू आहेत. कुलदीप यादवने सातत्याने विकेट्स घेतल्या आहेत. जेव्हा विकेट्सची गरज असते, तेव्हा आम्ही कुलदीपवर विश्वास ठेवतो.