निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथील शारदोपासक शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.
प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील प्रवासाची अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण विद्यार्थी योजनेअंतर्गत विविध गावांतील विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवासी पासचे वाटप करण्यात आले. ताडमुगळी, कलमुगळी, तगरखेडा, हालसी, माळेगाव, बालकुंदा आदी गावांमधून शिक्षणासाठी औराद शहाजानी येथे येणा-या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत प्रवासी पास उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील बससेवा नियमित व वेळेवर सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. नियमित बससेवा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा हातभार लागेल, असे मतही उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमास संस्थेचे शिवाजीराव जाधव, माडोळया मठपती, मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव, उपमुख्याध्यापिका आशा बेलुरे, पर्यवेक्षक किशोर गुंड, औराद शहाजानी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक व्यंकट चौधरी तसेच बालाजी कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धनराज मडले यांनी केले. सतीश हानेगावे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत अभ्यासात सातत्य व परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले.
















