मुंबई : प्रतिनिधी
पाणीपुरवठ्याबाबत जल सुरक्षित करण्याच्या व शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने अमृत २.० अभियानांतर्गत राज्यातील विविध शहरांत पाणीपुरवठा आणि प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, सातारा, शेगाव व भद्रावती या शहरात हाती घ्यावयाच्या पाणीपुरवठा तर सांगली शहरातील मलनि:सारण प्रकल्पांचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात येणार आहे. १,२०१ कोटी रुपये किमतीच्या या प्रकल्पांमुळे या शहरांतील नागरिकांना शुद्ध पाण्याचा शाश्वत पुरवठा तसेच मलनि:स्सारण सुविधा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर मोदींच्या हस्ते प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचे (पीएम-स्वनिधी) प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात येणार आहे.
देशातील शहरे पाणीपुरवठ्याबाबत जल सुरक्षित करण्याच्या व शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने सन २०१५ मध्ये अमृत अभियान सुरू केले आहे. २०२१ पासून अमृत २.० अभियान या नावाने हे अभियान अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. अमृत २.० अभियानातील प्रकल्पांची कामे सन २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या अभियानात राज्यातील १४५ शहरांचे २८३१५ कोटी रुपये किमतीचे ३१२ प्रकल्प केंद्र शासनाने मंजूर केले आहेत. या अभियानातून ४१.४७ लाख इमारतींना नळ जोडणीद्वारे शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार असून ३८.६९ लाख इमारतींना मलनि:सारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सोलापुरात १५ हजार
घरांचे आज लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापूर दौ-यावर येत आहेत. पंतप्रधान राज्यात प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत पूर्ण झालेल्या ९० हजार घरांचे लोकार्पण करणार आहेत. यात सोलापूरमधील रेनगर गृहनिर्माण संस्थेच्या १५ हजार घरांचे लोकार्पण केले जाणार आहे. लाभार्थींमध्ये हजारो हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग, कामगार, कचरा वेचणारे, विडी कामगार, चालक आदींचा समावेश आहे. तसेच पीएम-स्वनिधीच्या १० हजार लाभार्थ्यांना पहिल्या व दुस-या हप्त्याचे वितरण करणार आहे.