लातूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्ह्याची धुरा सक्षमपणे सांभाळली. एकीकडे कोरोनाचे संकट असताना रुग्णांची तपासणी आणि तात्काळ उपचारांची सोय व्हावी म्हणून डेडिकेटेड रुग्णालय सुरू करतानाच शासकीय वसतिगृहे ताब्यात घेऊन तेथे कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांची तपासणी आणि स्वतंत्र उपचारांची सोय उपलब्ध करून दिली. दुसरीकडे लातूर शहर मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावत भविष्याचा विचार करून शहरात नवीन पाईपलाईन, विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात विस्तारीत इमारतीत स्त्रीरोग, प्रसूती, बाल रुग्णालय, गावभागात अत्याधुनिक रुग्णालय तसेच नवीन जिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिली. शादीखाना, मुलींसाठी वसतिगृह, वाढत्या वाहनांमुळे विलासराव देशमुख मार्गाच्या माध्यमातून वाहतुकीची सोय यासह शहरातील १८ प्रभाग आणि मतदारसंघातील २८ गावांत रस्ते, शाळा, अंगणवाडी इमारत दुरूस्ती, नवीन बांधकाम, पाणीपुरवठा योजना अशा कितीतरी योजनांतून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम माजी मंत्री अमित देशमुख यांनी केले.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्रिपदाची धुरा सांभाळताना धोरणात्मक आणि विकासात्मक निर्णय घेऊन राज्याच्या विकासाला चालना देण्याचे काम केले. सोबतच लातूर शहर मतदारसंघात २१०० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून मतदारसंघात विकास कामांना गती दिली. यामध्ये २०५५ पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करून शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ३५९.२२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आरोग्याच्या दृष्टीने विचार करून विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीत २०० खाटांचे स्त्रीरोग, प्रस्ूतीशास्त्र आणि बाल रुग्णालयाला मंजुरी दिली तसेच आरोग्य केंद्र तपासणीला (मोहल्ला क्लिनिक) मंजुरी दिली. शहर सुशोभीकरणाच्या दृष्टीने ग्रीन बेल्ट विकसित केले तसेच रवींद्रनाथ टागोर गार्डन, महात्मा गांधी गार्डन यासह विविध गार्डनचा विकास केला.
भूमिगत गटार, सांडपाणी व्यवस्थापन आणि रस्ते योजनेसाठी ३०५.१९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. राष्ट्रीय स्वच्छ हवा शुद्ध कार्यक्रमांतर्गत मुलभूत सुविधा, व्हर्टिकल गार्डन, कारंजांसाठी १३ लाख ११ हजार रुपये निधी दिला. या सोबतच १ हजार कोटी रुपये खर्चाच्या नवीन बा वळण रस्त्याचे भूसंपादनही करण्यात आले आणि लातूर शहरात वाढती वाहतूक आणि वाहतूककोंडीचा विचार करीत विलासराव देशमुख मार्ग विकसित करून लातूरकरांना त्याच तोडीचा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे आणि तो मजूबत करण्याचा निर्णयही पालकमंत्री असताना अमित देशमुख यांनी घेतला. आता या रस्त्याचे मजबुतीकरण सुरू आहे. या शिवाय ओढे-नाले खोलीकरण, दुरूस्ती करून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहासोबतच पाणी झिरपण्याची प्रक्रिया वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. रुग्णालयात रुग्णांची सोय व्हावी, त्यांना योग्य उपचार मिळावेत, या दृष्टिकोनातून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला तब्बल ५०० कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी निधी दिला.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन सुसज्ज बा रुग्ण तपासणी केंद्र इमारत उभारण्यात आली. मुला-मुलींच्या नवीन वसतिगृहासाठी ४ कोटी, अल्पसंख्याक मुला-मुलींना वसतिगृह, ओबीसींसाठी वसतिगृह यासाठीही निधी दिला. उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतक-यांच्या मुलींसाठी राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब वसतिगृह उभारण्यात आले त्यासाठी ७ कोटींचा निधी दिला. या वसतिगृहाचे आता लोकार्पणही झाले. या शिवाय सारथी संस्थेच्या उपविभागीय कार्यालयासाठी १७४ कोटी रुपये, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ग्रंथालय, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह मंजूर केले. अद्ययावत शादीखाना उभारणीसाठी १० कोटी ८५ लाखांचा निधी, पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा, आंतरराष्ट्रीय दर्जाची अद्ययावत बाजारपेठ उभारणीसाठी २६० कोटी, बेघरांसाठी निवारा केंद्र यासाठी निधी दिला.
अनेक गावांत विद्युत लाईन
मतदारसंघातील अनेक गावांत नवीन विद्युत लाईन टाकली, नवीन रोहित्र बसविले, रोहित्र क्षमतावाढ केली, आवश्यक पोल बदलले. विद्युतीकरण करून ग्रामस्थांना विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यात आला. सांस्कृतिक सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय इमारत विस्तारीकरण, नवीन गाळे बांधकाम सुविधा उपलब्ध करून दिल्या.
मंदिर, दर्गा विकासाला निधी
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी पालकमंत्री असताना मतदारसंघातील विविध मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून दिला. यामुळे मंदिराच्या सभागृहासोबतच सुशोभीकरणही वाढले. श्री सिद्धेश्वर मंदिर, प्राचीन केशवराज मंदिर, रामंलिगेश्वर मंदिर, जैन मंदिर, प्राचीन गंगादेवी मंदिर, गंगापूर आदी मंदिरांना निधी देण्यात आला. या सोबतच हजरत सुरत शहावली दर्गाच्या विकासासाठीही निधी उपलब्ध करून दिला.
डेडिकेटेड रुग्णालय, केअर सेंटरचे कौतुक
लातूर येथे उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोविड-१९ रुग्णांसाठी ताब्यात घेऊन तेथे कोविड-१९ डेडिकेटेड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटसह इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. लातूर येथे समाज कल्याण विभागाच्या वतीने उभारण्यात आलेली सुसज्ज वसतिगृहे अधिग्रहित करून तेथे कोविड सेंटर सुरू केले.
लातूरमध्ये कोविडसाठी डेडिकेटेड रुग्णालय आणि केअर सेंटर सुरू करण्याच्या पालकमंत्री अमित देशमुख यांच्या निर्णयाचे राज्यभर कौतुक झाले. राज्यातील २२ लाख लोकांपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा केला. शेतमालाची वाहतूक विक्री व्हावी, यासाठी बारकाव्याने लक्ष दिले. एवढेच नव्हे तर कार्यालयातून फोन करून रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचे काम करतानाच रुग्णांना आवश्यक ती मदत देण्याचे कामदेखील या संकट काळात करण्यात आले. यामुळे आ. अमित देशमुख यांनी कोविड
काळात जी तत्परता दाखविली ते लातूरकर कदापि विसरू शकत नाहीत.