लातूर : प्रतिनिधी
येथील पोद्दार अॅक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटर व सार्वजनिक आरोग्य विभाग, लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियान अंतर्गत टीबी रुग्णांना मंगळवार दि. ३ जून रोजी न्यूट्रिशनल सपोर्ट किटचे वाटप करण्यात आले.
निक्षय मित्र होण्याची प्रेरणा घेऊन लातूर शहरामधील पोद्दार अॅक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरचे संचालक डॉ. अशोक पोद्दार यांनी ५० रुग्णांकरिता न्यूट्रिशनल किट देऊन या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी टीबी रुग्णांना डॉ. पोद्दार यांच्या मातोश्री मणीबाई पोद्दार यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते न्यूट्रिशनल किटचे वाटप करण्यात आले. पोद्दार हॉस्पिटलमार्फत देण्यात आलेले किट हे दातृत्व भावाचे उत्तम उदाहरण असून, समाजातील इतर दात्यांनी देखील याचप्रमाणे या अभियानात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त देविदास जाधव यांनी यावेळी बोलताना केले.
टीबीच्या निर्मूलनार्थ समाजातील विविध घटकांनी एकत्रित येऊन सहकार्य करण्याची तयारी ठेवणे आजघडीला अत्यावश्यक झाले आहे, असे मतही डॉ. पोद्दार यांनी व्यक्त केले. यावेळी लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त (आरोग्य) डॉ. पंजाबराव खानसोळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती, डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. स्वाती मजगे, भावना अशोक पोद्दार, डॉ. पल्लवी जाधव यांच्यासह आशा स्वयंसेविका आणि क्षयरोग विभागाचे कर्मचारी, पोद्दार हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. ऋषिकेश खरोळकर यांनी केले.