21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरबालविवाह प्रतिबंधासाठी शासकीय यंत्रणा सतत सक्रीय

बालविवाह प्रतिबंधासाठी शासकीय यंत्रणा सतत सक्रीय

लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागात व शहरी भागात ज्या ठिकाणी बालविवाह होत असेल तर त्याला तात्काळ रोखण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणेला कळवावे. बालविवाह प्रतिबंधासाठी शासकीय यंञणा सतत सक्रीय असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले. गाव स्तरावरील केडर व शासकीय यंत्रणेचा समन्वय व्हावा यासाठी क्राय संस्था मुंबई व कलापंढरी संस्था लातूर, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित कार्यशाळेत उपजिल्हाधिकारी महाडिक बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी. पी. सूर्यवंशी होते.

या वेळी विशेष बाल पोलिस पथकाच्या सौ. नलिनी गावडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे, बालन्याय मंडळाच्या सदस्या छाया मलवाडे, बाल कल्याण समितीचे महादेव झुंजे आदींची उपस्थिती होती. बालविवाह नियंत्रणासाठी सर्वत्र आमची यंत्रणा सक्रीय आहे. कलापंढरी संस्था बालकासंदर्भात करीत असलेल्या कार्याला जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून सर्वोत्तम सहकार्य मिळेल. बाल संरक्षणासंबंधीचे कार्यक्रम प्रत्येक शाळा, महाविद्यालये व गाव स्तरावर राबवले तर निश्चीत याचा फायदा बालकांना होईल, अशा संस्थेला सूचना देऊन उपजिल्हाधिकारी महाडिक म्हणाले की, जिथे जिथे बालकांचा प्रश्न उद्भवेल त्या वेळेस बालकांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन प्रश्न सोडवला जाईल, असे ते म्हणाले.

या वेळी गावडे म्हणाल्या की, किशोरी मुलींना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श या बाबत जागृत असले पाहिजे आणि यावर मोठ्या धाडसाने तात्काळ प्रतिबंध करायला शिका तसेच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसोबत चाईल्ड फ्रेंडली वातावरण ठेवले पाहिजे, असे सांगून त्यांनी दामिनी पथकाबाबत माहिती सांगून ८८३०१ १५४०८ या टोल फ्री क्रमांकांची माहिती दिली तसेच सायबर क्राईम कॉलविषयी सविस्तर माहिती दिली. ज्यांची सायबर क्राईमवर फसवणूक केली जात असेल त्यांनी १९३० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असेही सांगितले. यानंतर जिल्हा बाल विकास अधिकारी धम्मानंद कांबळे यांनी बालकांच्या सर्व प्रश्नांसाठी १०९८ या टोल फ्री क्रमांकाविषयी माहिती दिली. जिल्हा बाल संरक्षण कक्ष बालकांच्या सर्वोत्तम हिताचे काम करीत आहे. लातूर जिल्ह्यातील ८ बालकांना बाहेर देशात दत्तक दिले, असेही ते म्हणाले. या नंतर बाल कल्याण समितीची माहिती सदस्य महादेव झुंजे यांनी दिली. बालन्याय मंडळाच्या सदस्या अ‍ॅड. छाया मलवाडे यांनी किशोरी मुली, बाल संरक्षण यंत्रणेतील पदाधिकारी यांना बालकांवर पालकांनी संस्कार कसे करावेत, या विषयी सविस्तर माहिती दिली.

संस्थेचे अध्यक्ष सूर्यवंशी म्हणाले की, प्रत्येक गाव बालस्नेही करण्याचे स्वप्न आहे आणि ते शासकीय बाल संरक्षण यंत्रणा व गाव स्तरावरील केडर, पालक, बालक यांच्या मदतीने करण्यासाठी प्रयत्त करीत आहोत, असेही प्रतिपादन केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उदगीर, रेणापूर, चाकूर, अहमदपुर तालुक्यांतील बाल संरक्षण यंत्रणेतील पदाधिकारी आणि बालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलापंढरीच्या सर्व टीमने परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR