39.8 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयकॉंग्रेसची सरशी

कॉंग्रेसची सरशी

मध्य प्रदेश, राजस्थानात चुरस, छत्तीसगड, तेलंगणात कॉंग्रेसची बाजी?

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या असून, आज तेलंगणात अखेरच्या टप्प्यातील मतदान झाले. मतदान पार पडताच राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या पाचही राज्यांतील निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले असून त्यानुसार छत्तीसगड, तेलंगणात कॉंग्रेस बाजी मारत असल्याचे चित्र आहे.

मध्य प्रदेशातही कॉंग्रेसचेच पारडे जड मानले जात आहे. मात्र, बहुतांश अंदाजानुसार मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये चुरस असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात पुन्हा शिवराजसिंह चौहान सत्ता राखणार की कमलनाथ सत्तेवर येणार आणि राजस्थानात कॉंग्रेस सत्ता राखणार की, भाजपला संधी मिळणार, हे पाहण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. परंतु पाच राज्यांच्या निवडणुकीत कॉंग्रेसचीच सरशी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

एक्झिट पोलच्या सव्हेनुसार पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांत काँग्रेसच सत्तेच्या जवळ जात असल्याचे चित्र आहे. तेलंगणा, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सत्ता स्थापन करेल, असे सांगितले जात आहे. मात्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात मोठी चुरस असल्याचे मानले जात आहे. दोन्हीही राज्यात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐनवेळी कोण बाजी मारणार आणि सत्ता कोण स्थापन करणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जन की बात एक्झिट पोलनुसार यावेळी मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) सरकार स्थापन करू शकते. त्यांना १५ ते २५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तेलंगणामधील सीएनएनच्या एक्झीट पोलमधून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर येत असल्याचे चित्र आहे तर सत्ताधारी बीआरएसला राज्यात धक्का बसणार आहे. यात काँग्रेसला ५६ जागा मिळतील तर बीआरएसला ४८ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तसेच भाजपला १० जागा मिळतील, असा अंदाज आहे. इंडिया टिव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलनुसार तेलंगणात बीआरएस ७० जागा जिंकत सत्तेत परत येईल तर काँग्रेसला ३४ आणि भाजपला ७ जागांवर समाधान मानावे लागेल. यासोबतच औवैसींचा पक्ष ७ जागा जिंकू शकतो, असे म्हटले आहे.

राजस्थानमध्ये राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. राज्यातील २०० पैकी १९९ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. गेल्या अनेक वर्षांपासून राजस्थानात दर ५ वर्षांनी सत्ताबदल होतो, पण यावेळी जनता ही प्रथा बदलणार का, याकडे जनतेचे लक्ष आहे. बहुतांश कल कॉंग्रेसच्या बाजूने आले आहेत. ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने तर राजस्थानात काँग्रेसला ८६ ते १०६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे कॉंग्रेस इतिहास रचेल, असे सांगितले जात आहे.

मध्य प्रदेशात २३० जागांसाठी मतदान झाले. एक्झिट पोलमधून बहुतांश ठिकाणी काँग्रेस बहुमताचा आकडा गाठू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. पण काही पोल्समध्ये भाजप या बहुमताच्या जवळ असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील निकाल रंजक असण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश मोठे राज्य असून येथे भाजपला धक्का बसल्यास आगामी काळात समीकरणे बदलू शकतात.

छत्तीसगडमध्ये पुन्हा बघेलच?
छत्तीसगडमध्येही काँग्रेस आपली सत्ता राखणार असल्याचे चित्र आहे. छत्तीसगडमध्ये ९० जागा आहेत. त्यापैकी ४५ हा बहुमताचा आकडा आहे. यात कॉंग्रेस बाजी मारेल, असा अंदाज आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाने काँग्रेस छत्तीसगडमध्ये बहुमताचा आकडा पार करेल. काँग्रेसला ४० ते ५० जागा मिळतील, असे म्हटले तर भाजपला ३६ ते ४६ जागा मिळू शकतात. इतरही सर्व्हेमध्ये कॉंग्रेसच आघाडीवर आहे.

मिझोरममध्ये झेडपीएम?
मिझोरममध्ये झेडपीएम या प्रादेशिक पक्षाकडे एक्झिट पोलचा कल आहे. इंडिया टूडे-अ‍ॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार झेडपीएमला राज्यात मोठा विजय मिळत आहे. पक्षाला २८ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे मुख्यमंत्री झोरमथांगा यांच्या मिझो नॅशनल फ्रंटला केवळ ३ ते ७ जागा मिळतील असा अंदाज आहे, तर एबीपी-सी-व्होटरच्या मते एमएनएफच पुन्हा सत्ता स्थापन करू शकणार आहे. एमएनएएफला २१ पेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असे म्हटले आहे.

एबीपी-सी-ओटरचा अंदाज
मध्य प्रदेश
कॉंग्रेस : ११३ ते १३७
भाजप : ८८ ते १२
इतर : २ ते ८

राजस्थान
कॉंग्रेस : ७१ ते ९१
भाजप : ९४ ते ११४
इतर : ९ ते १९

छत्तीसगड
कॉंग्रेस : ४१ ते ५३
भाजप : ३६ ते ४८
इतर : ४ जागा

तेलंगणा
कॉंग्रेस : ४९ ते ६५
बीआरएस : ३८ ते ५४
भाजप : ५ ते १३
इतर : ५ ते ९

मिझोरम
एमएनएफ : १५ ते २१
झेडपीएम : १२ ते १८
आयएनएस : २ ते ८
इतर : ५

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR