नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज बीआरएस नेत्या के. कविता यांना दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी सशर्त जामीन मंजूर केला आहे. यामुळे कविता यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर केंद्रीय तपास संस्था ईडी-सीबीआयला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने कविता यांना दोन्हा प्रकरणांत जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे पाच महिन्यांनंतर त्याचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. के. कविता यांना ९ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.
न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने कविता यांना जामीन मंजूर केला आहे. कविता पाच महिन्यांपासून तुरुंगात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. या खटल्यात ४९३ साक्षीदार आणि ५०,००० कागदपत्रे आहेत. यामुळे या खटल्याची सुनावणी लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा नाही. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. जामिनाचा विचार करताना महिलांना विशेष वागणूक देण्याची कायद्यात तरतूद आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जामीन न देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला.
बीआरएस नेत्या के. कविता यांना दोन्ही प्रकरणांमध्ये प्रत्येकी १० लाख रुपयांचा जामीन बाँड भरण्यास सांगितले आहे. यासोबतच त्यांचा पासपोर्ट न्यायालयाकडे सोपवण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच खटल्यासंबंधी पुराव्याशी छेडछाड आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकला जाणार नाही, अशी अटही न्यायालयाने जामीन मंजूर करताना टाकली आहे. यावेळी कविता पीएमएलएच्या कलम ४५ अंतर्गत लाभांसाठी पात्र आहेत. सुशिक्षित महिलांशी भेदभाव करता येत नाही. न्यायालये या वर्गाप्रती संवेदनशील आणि सहानुभूती दाखवणारी असावीत, असा युक्तिवाद के. कविता यांच्या वतीने करण्यात आला.