मुंबई : प्रतिनिधी
‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून स्त्रीयांऐवजी पुरुषांनीच एक किंवा एकापेक्षा जास्त अर्ज केल्याचा प्रकार पुढे आला आहे. असे प्रकार रोखण्यासाठी राज्य शासन कठोर पावले उचलत असून अशा लोकांच्या बँक खात्यावर कारवाई करून बँक खाते सील करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यभर गाजलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ थेट पात्र महिलांच्या खात्यात पोहचत आहे. याच दरम्यान, बोगसगिरीकरून काहीजण खोटे अर्ज करत योजनेचे पैसे लाटण्याचा प्रत्यन करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. एका व्यक्तीने लाडकी बहीण योजनेचे ३८ अर्ज भरुन पैसे उचलल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाला होता.
राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एका व्यक्तीने ३८ अर्ज भरलेत. त्याने वेगवेगळ्या नावाने हे अर्ज भरले आणि पैसे काढले. त्यामुळे संबंधित बँकांना याबाबत कळवून पैसे परत मिळवण्याचे आदेश दिलेत आहेत.
तटकरे पुढे म्हणाल्या की, अशा प्रकारे फसवणूक करणा-यांचे बँक खाते सील केले जाणार आहेत. त्या खात्यांशी कोणतेही शासकीय व्यवहार केले जाणार नाहीत. १५-२० दिवसांमध्ये व्हेरीफिकेशन केले जाईल. २५ तारखेपासून जे पैसे मिळतायेत त्या महिलांनी पहिल्या दोन महिन्यात अर्ज केले होते त्यांना दिले जात आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटींपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्या अर्जांची छाननी केली जात आहे. चौकशीत ज्या नागरिकांनी दुसरेच आधारकार्ड वापरुन लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.