22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसंपादकीय‘ब्रँड मोदी’ ची कसोटी

‘ब्रँड मोदी’ ची कसोटी

भारताच्या राजकीय इतिहासात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर असणा-या सलग तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या विक्रमाची बरोबरी साधत नरेंद्र मोदी तिस-यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच! मात्र, नेहरूंच्या विक्रमाची बरोबरी करतानाच काँग्रेसच्या चारशेपेक्षा जास्त जागा जिंकून दणदणीत बहुमताचे सरकार स्थापन करण्याच्या विक्रमाचीही बरोबरी करण्यासाठी स्वत: मोदी यांनीच निश्चित केलेले ‘चारसौ पार’ चे लक्ष्य प्राप्त करण्यात ‘ब्रँड मोदी’ला साफ अपयश आले.

उलट ही ‘चारसौ पार’ची घोषणा ‘गले की हड्डी’ बनून भाजप स्वबळावर साधे बहुमत प्राप्त करण्यापासूनही ३२ जागांनी मागे राहिला. मागच्या ३०३ जागांवरून २४० जागांवर गडगडलेल्या भाजपला थेट ६३ जागांचे मोठे नुकसान सहन करावे लागल्याने ‘सब कुछ मोदी’ असेच चित्र निर्माण करणा-या ‘ब्रँड मोदी’ला जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळे साहजिकच ‘ब्रँड मोदी’ अस्ताकडे जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मोदी समर्थक त्याचा जोरदार प्रतिवाद करतील व सध्याही तसा तो चालू आहेच, त्यामुळे त्याचे कवित्व आता पुढच्या निवडणुकीपर्यंत कायमच राहणार आहे. मात्र, आपल्या राजकीय कारकीर्दीत नरेंद्र मोदी यांना प्रथमच स्पष्ट बहुमताशिवाय मित्रपक्षांच्या मदतीने आघाडी सरकार चालवावे लागणार आहे व हीच ‘ब्रँड मोदी’ची खरी कसोटी आहे. निवडणूक निकालांनी देशात निर्माण झालेल्या ‘ब्रँड मोदी’ला जोरदार तडा दिला आहे. त्यामुळे आता भविष्यात ‘ब्रँड मोदी’चे काय होणार, या चर्चेला तोंड फुटले आहे.

‘ब्रँड मोदी’ हा नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीतील त्यांच्या कार्यपध्दतीने निर्माण झाला आहे, हे येथे लक्षात घ्यावे लागेल. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून वा देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींनी जी सरकारे चालवली ती पक्षाला स्वबळावर पूर्ण बहुमत असणारीच होती. त्यामुळे आपल्या मर्जीनुसार सरकार चालविण्याची, धडाकेबाज निर्णय घेण्याची व सरकारच्या कामकाजाचे संपूर्ण श्रेय स्वत: घेण्याची पूर्ण मुभा आजवर त्यांना मिळालेली आहे. त्यातूनच ‘मोदी है तो मुमकीन है’ वगैरेपर्यंतच्या प्रतिमानिर्मितीचा ‘ब्रँड मोदी’ चा प्रवास आजवर झाला आहे. नेमके याच कार्यपध्दतीस नरेंद्र मोदी यांना आपल्या तिस-या टर्ममध्ये मोठा ब्रेक लागल्याचे पावलोपावली अनुभवावे लागणार आहे. आघाडी सरकारचे नेतृत्व करावे लागणे हेच ‘ब्रँड मोदी’समोरचे प्रमुख आव्हान असणार आहे. सरकारचे स्थैर्य की ‘ब्रँड मोदी’चे शाईन? हा प्रश्न पदोपदी नरेंद्र मोदी यांच्यासमोर धर्मसंकट बनून उभा राहणार आहे व मोदी ही परिस्थिती कशी हताळतात, हीच खरी कसोटी आहे आणि त्यावरच मोदी ३.० सरकारचे भविष्यही अवलंबून राहणार आहे.

त्याचा प्रत्यय सरकार स्थापन करण्याच्या प्रारंभिक हालचाली सुरू होतानाच भाजप व नरेंद्र मोदी यांना आलाच आहे. सहकारी पक्षांनी आपल्या मागण्या, मंत्रिपदे, नको असलेल्या मुद्यांवर सरकारने माघार घेण्याच्या सूचना वगैरे रेटण्यास प्रारंभ केलेला आहेच. त्यातच चंद्राबाबू नायडू व नितीशकुमार यांचा रालोआतील अनुभव भाजप व स्वत: ‘ब्रँड मोदी’ साठीही सुखावह निश्चित राहिलेला नाही. दोघेही राजकारणात पुरते मुरलेले आहेत व आपल्याला जे हवे ते मिळत नसल्यास बेधडक भूमिका बदलण्यात माहीर आहेत. यापूर्वी त्यांनी नरेंद्र मोदी यांना त्याचा अनुभव दिलेलाच आहे. मात्र, त्यावेळी ‘ब्रँड मोदी’ पुरता चढतीला वा शिखरावर असल्याने मोदींनी कुठल्याच सहकारी पक्षाच्या दबावाला अजिबात भीक घातली नव्हती. एवढंच काय पण मोदींना स्वपक्षीय सहका-यांचा विचार घेण्याची वा त्यांना विश्वासात घेण्याची गरज आजवर कधी वाटलेली नाही.

आता त्यांना ही कार्यपध्दती पूर्णपणे बाजूला ठेवून पाच वर्षे सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या कलाने सरकार चालवण्याची ‘तारेवरची कसरत’ करावी लागणार आहे. वाजपेयी यांच्यासारखा शांत, सर्वांना समजून घेणारा नेताही आघाडी सरकार चालविताना पुरता हतबल झाल्याचे देशाने पाहिलेलेच आहे. आघाडीतील मित्रपक्षांच्या मनमानी कारभाराने बदनामी सहन करावे लागलेले डॉ. मनमोहनसिंग सरकारही देशाने पाहिले व अनुभवले आहे. खरं तर या स्थितीतूनच ‘ब्रँड मोदी’ राज्य पातळीवरून देश पातळीवर येण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. नरेंद्र मोदी यांनी एकट्याच्या बळावर आघाडी सरकारची सद्दी संपवून स्वबळावर सरकार स्थापन करण्याची व दुस-या टर्ममध्ये या स्वबळात घसघशीत वाढ करून देण्याची किमया केल्यानेच ‘ब्रँड मोदी’ला देशपातळीवर झळाळी मिळाली होती, हे वास्तव नाकारता येणार नाहीच. याच ‘ब्रँड मोदी’ने १९८४ नंतर तिस-या टर्ममध्येही स्वपक्षाला २४० जागा मिळवून देण्याचा करिश्मा करून दाखवला आहे हे खरेच पण याचीच दुसरी बाजू ही की, ‘ब्रँड मोदी’ आता उतरणीला लागला आहे.

हे वास्तव स्वत: नरेंद्र मोदी कसे व कितपत पचवितात यावरच मोदी ३.० सरकारचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. हे आघाडी सरकार रेटून नेण्यात मोदी अपयशी ठरल्यास हाच ‘मोदी ब्रँड’ चा अस्त असेल. मोदी अत्यंत चाणाक्ष, महत्त्वाकांक्षी व चतुर नेते आहेत. त्यामुळे ‘मोदी ब्रँड ’ चा अस्त समोर दिसत असेल तर तो आपल्याला हवा त्या पध्दतीने म्हणजेच ‘विथ विनिंग नोट’ पध्दतीने व्हावा यासाठी ते पूर्ण प्रयत्न करतील. अशा स्थितीत सहकारी पक्षांच्या दबावापुढे न झुकता सत्ता सोडण्याची खेळी ते करू शकतात. अशा वेळी ‘इंडिया’ आघाडीला आपले ऐक्य कायम ठेवून उर्वरित काळासाठी सरकार चालविण्याचे आव्हान पेलवावे लागेल जे २४० सदस्य संख्या असणा-या सशक्त विरोधक भाजपच्या उपस्थितीत सोपे निश्चित नाही. भाजप असे सरकार सत्तेवरून खाली खेचण्याचा हरत-हेने प्रयत्न करेल. अशावेळी मध्यावधी निवडणुकीची वेळ येऊ शकते. अशावेळी मोदी या निवडणुकीतून स्वत:ला दूर करून ‘ब्रँड मोदी’च्या सन्मानजनक निवृत्तीला प्राधान्य देण्याची शक्यता सर्वांत जास्त आहे. तूर्तास ‘मोदी ब्रँड’च्या कसोटीचा काळ आजपासून सुरू झाला आहे हे निश्चित! ही कसोटी मोदी कशी पार पाडतात, हेच आता पहायचे!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR