24.8 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरभटक्या समाजाच्या जीवन संघर्षाशी नाट्यरसिक समरस 

भटक्या समाजाच्या जीवन संघर्षाशी नाट्यरसिक समरस 

लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात आहे. दि. ८ डिसेंबर रोजी स्पर्श बहुउद्देशिय सेवाभावी संस्था उदगीरच्या वतीने डॉ. मोनिका ठक्कर लिखीत व राजकिरण कुणकीकर दिग्दर्शित ‘कायनी दोस्त’ या दोनअंकी नाटकाचा प्रयोग झाला. तांत्रिकदृष्ट्या काही उणिवा असल्या तरी या नाटकाने नाट्यरसिकांपर्यंत सामाजिक संदेश पोचवला हे नक्की. भटक्या समाजाच्या वेदनांशी नाट्यरसिक समरस झाले.
आपल्या महाराष्ट्र भुमित प्राचीन काळापासून लोककलांनी समाजमन घडविण्याचे मोठे कार्य केले आहे. ती अखंडीत परंपरा आज मोडकळीस येत आहे. हे शल्य मनाशी धरुन डॉ. मोनिका ठक्कर यांनी ‘कायनी दोस्त’ या संहितेस रंगमंचावर आणण्याचा निश्चय केला. याच लोककलावंतांपैकी पोतराज आपण सा-यांनी पाहिलाय, पण त्याचे दु:ख, वेदना, संघर्ष याच्याशी समरस होण्याइतका वेळ समाज म्हणुन आपल्याकडे नाही. स्वत:ला आसुडाने फोडून घेणारा हा पोतराज विदर्भातला आहे. त्याची ही कहाणी म्हणजे वैदर्भीय बोली भाषेत कायनी. पोतराजाची ही कायनी सांगत असतानाच रायंदर, ठग, अशा भटक्या जमातीतील अंतर्गत वेदनांचा पट नाट्यरसिकांसमोर मंचीत करण्यात आला. या भटक्या जमातींना कधीही जात, धर्म, गाव, शहर याच्या मर्यादा पडलेल्या नाहीत. म्हणून वाटते जातीअंताची लढाई हे लढतात पण या लढाईत वारंवार तेच हरतात. हे त्यांना तर कुठे ठाऊक आहे.
तिसरी घंटा वाजते, पडदा उघडतो… बिल्या (मनोज झुंगा) सद्गुरुला नमन घालतो आणि सुरु होतो तो भटक्यांचा जीवन संघर्ष. मनोज झुंगा या कलवंताने बिल्याची भुमिका अतिश्य समर्थपणे उभी केली. त्याच्या अभिनयाने नाटकाला उचलून धरले. त्याला भुत्या (गगण डब्बे) या पोतराजाने चांगली साथ दिली. शब्बो (भुमिका सोनवणे), श्वेता (स्नेहा बुंद्राले), लक्ष्मी (करुणा भदाडे), पीएसआय (अमित सोनकांबळे), कॉन्स्टेबल (सोनाली ढगे-बिरादार), मजूर (नरसिंग कांबळे), इतर (सिद्धार्थ कांबळे, मयुरी गाजरे, नितेश, सुनील, अरुण, सागर, नागेश्वर, आकाश, अमोल तलवाडकर) यांनी आपापल्या भुमिका  पार पाडल्या.
दिग्दर्शकाची जबाबदारी राजकिरण कुणकीकर यांनी पार पाडली. संहितेला नाट्यरुप देताना कुणकीकर यांनी कल्पकता पणाला लावल. परंतु, लोककलावंतांचा लवाजमा असताना त्यात आणखी बरेच काही करता येण्यासारखे होत.े अनेक जागा उत्तमरितीने साकारता आल्या असत्या. सचिन बिरादार यांचे नैपथ्य ब-यापैकी होते. त्यांनी पालावरील जीवन उभे करण्याचा प्रयत्न ब-यापैकी केला. सारंग लोहकरे यांचे संगीत संयोजन ब-याचदा एकसुरी वाटले. आर. कुणकीकर यांची प्रकाश योजना परिणामकारक दिसून आली नाही. नागेश्वर झुंगा यांची वेशभूषा पात्रांना साजेशी होती तर सिद्धार्थ कांबळे यांनी रंगभूषेची जबाबदरी पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR