मुंबई : प्रतिनिधी
राज्यामध्ये बीडमधील हत्या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. यानंतर आता विरोधकांनी सत्ताधारी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेसोबत आक्षेपार्ह कृत्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
दरम्यान, महायुतीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. धनंजय मुंडेंनंतर विरोधकांनी भाजप नेते व विद्यमान मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. थेट नाव घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या आरोपांना दुजोरा दिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार राऊत म्हणाले की, स्वारगेटप्रमाणे जे प्रकरण समोर येत आहे. तसाच एक प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय. शिवकाळातील सरसेनापाती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला आहे, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. ती अबला महिला पुढील काही दिवसांत विधान भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.