18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवभाजपा, शिंदे सेनेच्या जिवावर राष्ट्रवादीची सवारी

भाजपा, शिंदे सेनेच्या जिवावर राष्ट्रवादीची सवारी

मच्छिंद्र कदम
धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघात मविआतील तीन प्रमुख पक्षांच्या वतीने विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील असे एक खासदार व एक आमदार यांच्या संख्येनुसार उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे आ. अभिमन्यू पवार, राजाभाऊ राउत, आ. राणाजगजितसिंह पाटील हे भाजपाचे तीन आमदार तर आ. तानाजी सावंत, आ. ज्ञानराज चौगुले हे दोन आमदार शिंदे सेनेचे असताना महायुतीमध्ये मात्र भाजपा, शिवसेने (शिंदे गट) ला उमेदवारी न देता एकही आमदार, खासदार नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( अजित पवार गट) ला येथील उमेदवारी दिली.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भाजप व शिंदे सेनेवरच सवारी सुरू असल्याची चर्चा या मतदारसंघात सध्या रंगू लागली आहे.
दरम्यान महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा सामना या ठिकाणी होणार आहे. त्यात वंचितकडून शिवसेनेचे े भाऊसाहेब आंधळकर यांच्या उमेदवारीमुळे आणखी चुरस वाढली आहे, याशिवाय आणखी कितीजण अर्ज दाखल करणार हे १९ एप्रिलनंतर स्पष्ट होणार आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव, परंडा, बार्शी, तुळजापूर, उमरगा, औसा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये धाराशिव, कळंब मतदारसंघावर ठाकरे सेनेचे आ. कैलास पाटील हे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. मागील २०१९ पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीकडून त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांना ८७ हजार ४८८ मते मिळाली होती. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीकडून संजय निंबाळकर यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना ७४ हजार २१ मते मिळाली होती तर अपक्ष उमेदवार अजित पिंगळे यांना २० हजार ५७० मते मिळाली होती. यात आता महाविकास आघाडीमध्ये संजय निंबाळकर व आ. कैलास पाटील हे एकत्र आहेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ९९ हजार ३४ मते पडली होती. तर काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना ७५ हजार ८६५ मते मिळाली. वंचितचे अशोक जगदाळे यांना ३५ हजार ३८३ मते मिळाली तर महेंद्र धुरगुडे यांना ७ हजार ४५८ मते पडली होती. या मतदारसंघात आता अशोक जगदाळे हे महाविकास आघाडीकडून आहेत.

तर मधुकरराव चव्हाण हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे सेनेचे आ. ज्ञानराज चौगुले हे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना ८६ हजार ७७३ मते मिळाली होती. तर काँगे्रसचे दत्तू भालेराव यांना ६१ हजार १८७ मते, जालिंदर कोकणे ७ हजार ८३५ मते, वंचितचे रमाकांत गायकवाड यांना ७ हजार ४७६ मते मिळाली. या मतदारसंघात बसवराज पाटील हे भाजपात गेले आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. परंडा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आ. तानाजी सावंत हे करत आहेत. त्यांना एक लाख ६ हजार ६७४ मते मिळाली होती. राहुल मोटे यांना ७३ हजार ७७२ मते तर वंचितचे सुरेश कांबळे यांना २७ हजार ९३९ मते मिळाली होती. यामध्ये सावंत यांचा लोकसभेबाबत संभ्रम दिसत आहे.

बार्शी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आ. राजाभाऊ राऊत हे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना मागील निवडणुकीत ९५ हजार ४८२ मते मिळाली होती. तर दिलीप सोपल यांना ९२ हजार ४०६ मते, निरंजन भूमकर यांना १६ हजार ११९ मते, विशाल कळसकर यांना ११ हजार ४२७ मते मिळाली होती. औसा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आ. अभिमन्यू पवार हे नेतृत्व करत आहेत. त्यांना ९५ हजार ३४० मते मिळाली होती. तर बसवराज पाटील यांना ६८ हजार ६२६ मते, बजरंग जाधव यांना ९ हजार ५८८ मते, सुधीर पोतदार यांना ८ हजार १६८ मते मिळाली होती. या मतदारसंघातही बसवराज यांच्या भाजपा प्रवेशामुळे काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमधील मतांची गोळाबेरीज केली तर महायुतीकडे मतांची आकडेवारी अधिक असल्याचे दिसते. मात्र विधानसभा मतदानाची ही टक्केवारी पुढे लोकसभेसाठी राहिली नसल्याचे लोकसभेच्या अनेक निवडणुकींवरून दिसून आले आहे. यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये आमदारांची संख्या जादा असताना याठिकाणी महायुतीचा उमेदवार विजयी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. तसेच मागील लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार आता महाविकास आघाडीकडून लढत आहे.

तर महाविकास आघाडीचे उमेदवार राहिलेले आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आता महायुतीकडून लढत आहेत. मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना ५ लाख ९६ हजार ६४० मते मिळाली होती. राणाजगजितसिंह पाटील यांना ४ लाख ६९ हजार ७४ मते तर वंचितचे अर्जुन सलगर यांना ९८ हजार ५७९ मते मिळाली होती. यामध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा १ लाख २७ हजार ५६६ मतांनी विजय झाला होता. यावेळी या मतदारसंघात मोठी राजकीय उलथा-पालथ झाली आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार हे सांगणे कठीण झाले असून निवडणूक निकालानंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे.

मतदारसंघात राजकीय उलथापालथ
धाराशिव लोकसभा मतदारसंघात मागील २०१९ च्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे उमेदवार होते. तर महाविकास आघाडीकडून राणाजगजितसिंह पाटील होते. यावेळी पक्षांतर व शिवसेना, राष्ट्रवादीतील दोन गटानंतर उलटी गणिते झाली आहेत. तसेच कळंब विधानसभा मतदारसंघात आ. कैलास पाटील व राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर हे विरोधात होते. ते महाविकास आघाडीत एकत्र आले आहेत. औसा, उमरगा या दोन विधानसभा मतदारसंघांत आ. अभिमन्यू पवार यांच्या विरोधात लढलेले बसवराज पाटील एकत्र आले आहेत. तशी परिस्थिती तुळजापूर विधानसभेत दिसून येत आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे सोलापूर येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर ते स्पष्ट होणार आहे. तुळजापूर विधानसभेत वंचितकडून लढलेले अशोक जगदाळे मात्र महाविकास आघाडीत आहेत.

शिवसेनेच्या भूमिकेबाबत मात्र मतदार संघात संभ्रम
धाराशिव लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे आ. तानाजी सावंत, आ. ज्ञानराज चौगुले हे दोन आमदार आहेत. तसेच रंिवद्र गायकवाड हे माजी खासदार आहेत. महायुतीमधील घटक पक्षातील असलेले हे नेते धाराशिवची जागा शिवसेनेला मिळेल, या आशेवर होते. मात्र राष्ट्रवादीला जागा मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये मोठी नाराजी आहे. महायुतीमधील उमेदवारांच्या प्रचारामध्ये ते सक्रीय दिसून येत नाहीत. तर शिवसेनेचे असलेले भाउसाहेब आंधळकर यांनी तर वंचितमध्ये प्रवेश करुन ते वंचितकडून निवडणूक लढवत आहेत. एकंदरीत धाराशिव लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या भूमिकाबाबत संभ्रम असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR