36.2 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeपरभणीमतदारांना भावतोय महायुतीच्या जानकरांचा साधेपणा

मतदारांना भावतोय महायुतीच्या जानकरांचा साधेपणा

सुधीर गो. बोर्डे
परभणी : पहाटेच उठून मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर त्या ठिकाणी येणा-या मॉर्निंग वॉक ग्रुप सदस्यांसह महिला मंडळ व ज्येष्ठांशी आपुलकीने संवाद साधत जिल्ह्याच्या प्रश्नावर चर्चा करणे. याशिवाय कुठल्याही गावात लग्न समारंभ किंवा धार्मिक कार्यक्रमाला कुठलाही बडेजाव न दाखवता अगदी साधेपणाने हजेरी लावणे.

एवढेच नव्हे तर अगदी भाजीपाला, पाणीपुरी विक्रेत्यांशी नम्रतेने संवाद साधून त्यांच्याकडून शहरातील उद्योग- व्यवसायासह रोजगारविषयक प्रश्नावर चर्चा करणा-या महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा साधेपणा मतदारांना भावतोय. त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी मतदारांवर प्रभाव टाकणारी ठरत आहे. त्यांच्या या साध्या राहणीमान व विनम्रतेची चर्चा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांत होताना दिसून येत आहे.

महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे उच्चशिक्षित इंजिनीअर असून मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी गेल्या ४० वर्षांपासून स्वत:ला सामाजिक चळवळीत वाहून घेतले आहे. रासपचे अध्यक्ष असलेल्या महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी परभणीत झालेल्या कार्यक्रमातून आपण परभणी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या वाट्याला आलेली ही जागा राष्ट्रवादीने रासपला दिली आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर परभणी लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले.

महायुतीचे जानकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी झालेल्या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी रासपचे जानकर हे ब्रह्मचारी असून त्यांनी स्वत:ला देशसेवेसाठी वाहून घेतले असल्याचे सांगितले. तसेच स्वत: जानकर यांनी देखील पत्रकार परिषदेतून आपल्याला घर देखील नसून आपण ज्या गावी मुक्काम पडेल तिथे कार्यकर्त्यांच्या घरी राहून मिळेल ते खातो असे सांगितले होते. त्यामुळे महायुतीचे उमेदवार जानकर यांच्या साधेपणाच्या या गोष्टी वर्तमानपत्रातून प्रसिध्द होताच त्या नागरिकांना अतिशय भावल्या होत्या.

निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आली असून महायुतीचे जानकर पहाटेच उठून मॉर्निंग वॉकला येणा-या नागरिकांशी संवाद साधत आहेत. महायुतीचे जानकर हे पँट, शर्ट व पायात चप्पल अशा अतिशय साध्या वेशभूषेत गावोगावी प्रचार दौरे करीत असून नागरिकांशी जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर चर्चा करत आहेत. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय विनम्रतेने उत्तरे देत आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा साधेपणा व विनम्रता नागरिकांवर प्रभाव पाडताना दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR