नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. गायकवाड ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. मैदानावर विरोधी संघाविरुद्ध प्रदीर्घ लढा देणा-या गायकवाड यांना वयाच्या ७१ व्या वर्षी ब्लड कॅन्सरपुढे हार पत्करावी लागली. ३१ जुलै रोजी वडोदरा येथील भैलाल अमीन जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अंशुमन गायकवाड हे आजारपणामुळे शेवटच्या काळात आर्थिक संकटात सापडले होते. यावेळी माजी कर्णधार कपिल देव यांच्या माध्यमातून ही बातमी समोर आल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्या लंडनमधील उपचारासाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. अंशुमन गायकवाड यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिले की, श्री. अंशुमन गायकवाडजी क्रिकेटमधील त्यांच्या योगदानासाठी स्मरणात राहतील. ते एक प्रतिभावान खेळाडू आणि उत्कृष्ट प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने खूप दु:ख झाले. ओम शांती. यासोबतच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आपल्या शोकसंदेशात लिहिले आहे की, श्री. अंशुमन गायकवाड यांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रति माझ्या सहवेदना. संपूर्ण क्रिकेट जगतासाठी ही दु:खद घटना आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
गायकवाड यांची क्रिकेट कारकीर्द
अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले. या दरम्यान, त्यांनी कसोटीत २ शतके आणि १० अर्धशतकांसह १९८५ धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक २०१ धावांची खेळी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध खेळली. तर एकदिवसीय सामन्यात त्यंनी २६९ धावा केल्या. गायकवाड यांनी १९९७-९९ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारीही सांभाळली होते. यानंतर काही काळ ते केनियाचे प्रशिक्षकही होते.