पुढील २ वर्षांत फक्त १ हजार रोजगार उपलब्ध होणार, रोजगार निर्मितीच्या आकड्यांचा खेळ फसवा
खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख यांची व्यवस्थापनाशी चर्चा
लातूर : प्रतिनिधी
भाजपा सत्ताधा-यांनी खूप मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी लातूरला सुरू केली. परंतु गेल्या ९ वर्षांत मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत रोजगार निर्मिती झालीच नाही. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे तरुणांनी उपोषण सुरू केले. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. शिवाजी काळगे व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी (दि. २७) मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत जाऊन किनेट कंपनीच्या व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी रोजगार निर्मितीच्या आकड्यांचा फसवा खेळ उघड झाला.
या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख म्हणाले की, मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल, अशी स्वप्ने दाखवण्यात आली. परंतु आम्हाला या लाखो रोजगारांचे आकडे मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत सापडले नाहीत. येत्या २ वर्षांत केवळ १ हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. यावरून रोजगार निर्मितीच्या आकड्यांंचा खेळ किती फसवा होता, हे लक्षात येते.
मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे खूप मोठे स्वप्न स्थानिक तरुणांना दाखवण्यात आले होते. परंतु गेल्या ९ वर्षांत तरुणांच्या स्वप्नाचा चुराडा झाल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे व्यवस्थापक सत्यमूर्ती, राघवेंद्र, कांताराजू आणि प्रदीप महाला यांच्याशी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देऊन कसलेही कारण न देता काढून टाकणे, स्थानिक लघु उद्योजकांचे बिल थकविणे, महिला कर्मचा-यांशी असभ्य वागणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर सत्यमूर्ती यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपोषणकर्त्या स्थानिक तरुणांचा फेरविचार करू, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देऊ, असे आश्वासन दिले.
या वेळी डॉ. शिवाजी काळगे यांनीही मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या व्यवस्थापनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, अॅड. प्रवीण पाटील, प्रवीण सूर्यवंशी, गुरुनाथ गवळी आदी उपस्थित होते.
लेखी आश्वासन येईपर्यंत उपचार घेणार
मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीला भेट दिल्यानंतर खासदार डॉ. शिवाजी काळगे व जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थानिक तरुणांच्या उपोषणस्थळी भेट दिली. तेथे त्यांनी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या व्यवस्थापनाशी झालेली चर्चा उपोषणकर्त्यांना सांगितली. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी लेखी आश्वासन येईपर्यंत वैद्यकीय उपचार घेण्यास प्रतिसाद दिला.
















