नांदेड : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हदगाव येथे मराठा आंदोलकांनी शिंदे सेनेचे आ. बाबुराव कोहळीकरांच्या हदगाव येथील संपर्क कार्यालयात धडक देत आरक्षणाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तेथेच आमरण उपोषण सुरू केले आहे. यामुळे आ. कोहळीकरांचा ताण वाढला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या प्रश्नावर शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली व कार्यालयातच ठिय्या मांडला.आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनाची भूमिका तीव्र होत असताना हदगावमध्येही शिंदे सेनेचे आ. कोहळीकर यांच्या कार्यालयात आंदोलकांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडली.आंदोलकांनी आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने केवळ आश्वासने न देता ठोस व कायदेशीर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात काही काळ राजकीय वातावरणही तापले होते.
मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाने गांभीयार्ने पाहून आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. शिंदे सेनेचे आ. बाबुराव कोहळीकर यांनी शासनस्तरावर समाजाच्या मागण्या मांडून त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच आरक्षणाच्या मागणीची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमदार व खासदारांच्या घरासमोर आंदोलन तीव्र करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
















