31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण, संविधान बदलाच्या प्रचाराचा लोकसभेत फटका

मराठा आरक्षण, संविधान बदलाच्या प्रचाराचा लोकसभेत फटका

अजित पवार, छगन भुजबळांनी सांगितला पक्षाचा रोडमॅप विधानसभेला शिंदेसेने एवढ्याच जागा मिळाव्यात

मुंबई : (प्रतिनिधी) संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीत केला व तो खोडून काढण्यात आम्ही कमी पडलो. त्याचा फटका आम्हाला बसला. पण चंद्र-सूर्य असेपर्यंत संविधान कोणीही बदलू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. शिव-शाहू-फुले आणि आंबेडकरांचे विचार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील आत्मा आहे. काहीही झाले तरी हा विचार आम्ही कधीच सोडणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात बोलताना दिली. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशाची चिरफाड करताना दुरावलेल्या समाजघटकांना सोबत घेण्यासाठी पुढील काळात विशेष प्रयत्न करावे लागतील असे सांगितले. तसेच विधानसभेला शिंदेंच्या शिवसेनेएवढ्याच जागा राष्ट्रवादीला मिळाल्या पाहिजेत अशी मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हा पहिलाच वर्धापनदिन होता. अजित पवार गटाने मुंबईत तर शरदचंद्र पवार गटाने अहमदनगर येथे पक्षाचा वर्धापनदिन साजरा केला. पक्ष पदाधिका-यासमोर बोलताना अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकांत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही याबद्दल खंत व्यक्त केली. रायगडच्या एकमेव जागेवर आपल्याला विजय मिळाला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षाची लाज राखली. संविधान बदलणार म्हणून विरोधी पक्षांनी खोटे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश मिळाले. सीएएबददल मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण केला गेला. आदिवासी-दलित समाजात देखील हीच परिस्थिती निर्माण केली गेली.लोकसभा निवडणुकीत कापूस,सोयाबीन,दूध प्रश्नांनी फटका दिला. कांद्याने तर पार रडविले. याबाबत देखील मार्ग काढण्यात येणार असल्याचे अजित पवार म्हणाले. पण राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सहभागी झालेला असला तरी शिव-शाहू-फुले आणि आंबेडकरांचे विचार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा आहे. काहीही झाले तरी हा विचार आम्ही कधीच सोडणार नाही. चंद्र-सूर्य असेपर्यंत कोणी संविधान बदलू शकणार नाही. लोकसभेत अपयश मिळाले असले तरी खचून जाण्याचे कारण नाही. पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचे आहे. आम्ही परत एकदा संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत. मी आठवडयातले तीन दिवस मुंबईत तर चार दिवस महाराष्ट्रभरात पक्षाचे काम करणार आहे. येत्या ऑगस्ट पर्यंत राज्यसभेत पक्षाचे तीन सदस्य झालेले असतील. केंद्र सरकारच्या स्थैर्याबददल विरोधक काहीही बोलत आहेत. पण येत्या काही दिवसांतच रालोआची सदस्य संख्या ३०० च्या वर गेलेली दिसेल असेही अजित पवार म्हणाले.

आमदारांबाबत जाणीवपूर्वक संभ्रम
पक्षाच्या आमदारांबददल जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक जण तर असे बोलतो की जणू काही आमचा आमदार रोज त्याच्याशी फोनवरून बोलत असतो अशा शब्दांत त्यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता टीका केली. मात्र असे काहीही नाही. विरोधक जाणीवपूर्वक बातम्या पेरत आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे अजित पवार म्हणाले.

भुजबळांची फटकेबाजी
यावेळी बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत कानपिचक्याही दिल्या. मराठा आरक्षण, संविधान बदलाच्या प्रचारामुळे मागासवर्गीय आणि आदिवासी समाजात निर्माण झालेली अस्वस्थता, दुरावलेले अल्पसंख्यांक, मराठा आरक्षण, ओबीसी असे सर्वच समाजघटक बाजूला गेल्याने लोकसभेत मोठा फटका बसला. चारसो पार च्या ना-यामुळे दलित आदिवासींमध्ये गैरसमज झाला. उत्तरप्रदेशातही संविधानाबाबत प्रचार झाला, त्यामुळे महायुतीच्या जागा कमी आल्या. कोणी तरी दुखावेल म्हणून मलाही प्रचारासाठी बोलण्याचे टाळले गेले, पोस्टरवर माझे फोटो छापले नाहीत. तरीही ज्यांची मतं मिळतील असं वाटतं होते त्यांची तर मतं मिळालीच नाहीत, उलट दुसरीही मतं गेली, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

लोकसभा निवडणूकीत महायुतीला ठेच लागली हे नाकारुन उपयोग नाही. दगडधोंडे बाजूला करावे लागतील. आता विधानसभेची निवडणूक आहे. संविधान बदलाचाचा विषय असणार नाही. दलित, ओबीसी, मराठा हे आपले मतदार आपल्याला परत मिळवावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील. त्यांना विश्वास द्यावा लागेल. मुंबईत प्रत्येक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. ⁠विकास विकास आणि विकास मात्र मुंबईत किती निवडून आले आहेत. लाखो कोटी खर्च केले, मात्र आपले उमेदवार निवडून आले नाहीत, असंही भुजबळ यांनी सांगितलं. विधानसभेला शिंदेंएवढ्या जागा आम्हाला मिळायला हव्यात. जागा वाटपाचे गु-हाळ शेवटपर्यंत चालवून तुमचा फायदा होणार नाही. याचा लवकर निपटारा करायला पाहिजे. उमेदवार काय करायचे नंतर ठरवा. भाजप मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, मान्य आहे. पण आम्ही सुद्धा सांगितलं की, आमचे जेवढे आमदार आहेत, तेवढेच शिंदेंचे आहेत. त्यामुळे त्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळायला हव्यात, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलें.

शरद पवारांचा उल्लेख करताना दादांचा आवाज भरून आला !
पक्षाच्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीचा लेखाजोखा अजित पवार यांनी मांडला. शरद पवार यांनी अत्यंत समर्थपणे चोवीस वर्षे पक्षाचे नेतृत्व केल्याचां उल्लेख करताना, अजितदादांनी शरद पवार यांच्याबददल कृतज्ञताही व्यक्त केली. पक्षाचे संस्थापक नेते संगमा, तारिक अन्वर आदी नेत्यांबरोबर दिवंगत आर.आर.पाटील यांचाही अजित दादांनी आवर्जून उल्लेख केला. पक्षाने चोवीस वर्षांत घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली. शरद पवार यांचा उल्लेख करताना त्यांचा स्वर गहिवरला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR