महात्मा जोतिराव गोविंदराव फुले हे भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक क्रांतिकारी विचारवंत, शिक्षणप्रेमी, समाजसुधारक आणि मानवतावादी नेते होते. भारतीय समाजात शतकानुशतके रुजलेल्या जातिभेद, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष असमानता, अंधश्रद्धा आणि सामाजिक शोषणाविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. समाजातील वंचित, शोषित, स्त्रिया, शेतकरी आणि बहुजन घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांनी विचार आणि कृती या दोन्ही पातळ्यांवर कार्य केले. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, समानता हा सुसंस्कृत समाजाचा पाया आहे आणि माणसाचे मूल्य त्याच्या जन्मावर नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वावर ठरले पाहिजे, हा विचार त्यांनी समाजमनात रुजविण्याचा प्रयत्न केला. २८ नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे म्हणजे केवळ एका महान समाजसुधारकाला अभिवादन करणे नव्हे, तर त्यांनी दाखविलेल्या सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करणे होय.
महात्मा जोतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांचे कुटुंब फुलांचा व्यवसाय करीत असल्याने त्यांना ‘फुले’ हे आडनाव प्राप्त झाले. लहानपणापासूनच त्यांनी सामाजिक विषमतेचे वास्तव अनुभवले. त्या काळात शिक्षणाची साधने समाजातील सर्व घटकांसाठी समान प्रमाणात उपलब्ध नव्हती. जातीय उतरंड आणि परंपरागत सामाजिक बंधनांमुळे बहुसंख्य लोकांना ज्ञानापासून दूर ठेवले जात होते. अशा परिस्थितीत ज्योतिरावांनी शिक्षण घेतले आणि सभोवतालच्या सामाजिक वास्तवाचे चिकित्सक निरीक्षण केले. शिक्षणामुळे त्यांच्या विचारांना व्यापकता प्राप्त झाली. समाजातील अन्यायकारक रूढी, परंपरा आणि विषमतेच्या व्यवस्थेविषयी त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. पुढे याच प्रश्नांनी त्यांच्या सामाजिक कार्याला दिशा दिली.
ज्योतिरावांच्या जीवनातील एका प्रसंगाचा त्यांच्या विचारविश्वावर विशेष प्रभाव पडल्याचे सांगितले जाते. एका ब्राह्मण मित्राच्या विवाहप्रसंगी वरातीत सहभागी झालेल्या ज्योतिरावांना त्यांच्या जातीमुळे अपमानास्पद वागणूक सहन करावी लागली. माणसाचे मूल्य त्याच्या गुणांवर आणि कर्तृत्वावर ठरण्याऐवजी जन्माधारित जातीवर ठरविणा-या व्यवस्थेचे स्वरूप त्यांना या अनुभवातून प्रकर्षाने जाणवले. मात्र, त्यांनी या अपमानाला केवळ वैयक्तिक वेदना म्हणून स्वीकारले नाही. त्यातून सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा घेतली. समाजातील अन्यायाचे मूळ शोधून ते दूर करण्यासाठी शिक्षण, संघटन आणि वैचारिक प्रबोधन या मार्गांचा त्यांनी स्वीकार केला. त्यांच्या दृष्टीने समाजसुधारणा म्हणजे केवळ काही रूढी बदलणे नव्हते, तर माणसामाणसांतील असमानतेला आधार देणारी संपूर्ण सामाजिक मानसिकता बदलणे होते.
महात्मा फुले यांच्या कार्यातील सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. त्या काळात स्त्रियांना शिक्षण देण्याची कल्पनाच अनेकांना मान्य नव्हती. स्त्रीचे जीवन घर, कुटुंब आणि पारंपरिक जबाबदा-यांपुरते मर्यादित ठेवण्याची मानसिकता समाजात प्रबळ होती. स्त्री शिक्षित झाली तर कुटुंबव्यवस्था बिघडेल, अशा चुकीच्या समजुती पसरलेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ज्योतिरावांनी स्त्रीशिक्षणाचे महत्त्व ओळखले. १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. या कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी स्वत: शिक्षण घेतले आणि मुलींना शिकविण्याचे कार्य स्वीकारले. शिक्षिका म्हणून शाळेत जाताना त्यांना अपमान, शिवीगाळ आणि विरोधाचा सामना करावा लागला. काही लोक त्यांच्यावर चिखल आणि शेण फेकत असत; तरीही त्यांनी शिक्षणाचे कार्य थांबविले नाही. जोतिराव आणि सावित्रीबाई यांनी एकत्रितपणे उभे केलेले हे कार्य भारतीय स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरले.
स्त्रीशिक्षणाचा प्रश्न हा केवळ शाळा सुरू करण्यापुरता मर्यादित नाही, तर स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून मान्यता देण्याशी संबंधित आहे, हे महात्मा फुले यांनी ओळखले होते. स्त्रीला शिक्षण मिळाले तर ती स्वत:च्या अधिकारांविषयी जागरूक होईल, अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकेल आणि कुटुंबासह समाजाच्या विकासात सक्रिय योगदान देऊ शकेल, असा त्यांचा विश्वास होता. मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांनी विधवांच्या प्रश्नांकडेही संवेदनशीलतेने लक्ष दिले. बालविवाह, अल्पवयात वैधव्य, विधवांचे केशवपन आणि त्यांच्यावर लादल्या जाणा-या सामाजिक बंधनांमुळे अनेक स्त्रियांचे जीवन यातनामय होत होते. विधवांना समाजाकडून सन्मान मिळण्याऐवजी अपमान आणि बहिष्कार सहन करावा लागत होता. अशा स्त्रियांना आधार देण्यासाठी जोतिराव आणि सावित्रीबाई यांनी प्रयत्न केले. १८६३ मध्ये त्यांनी गर्भवती विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सामाजिक बदनामीच्या भीतीने नवजात बालकांची हत्या करण्यास भाग पडणा-या स्त्रियांना सुरक्षित आश्रय मिळावा, हा या उपक्रमामागील मानवतावादी उद्देश होता. एका विधवेच्या मुलाला त्यांनी दत्तक घेऊन त्याचे संगोपन केले. या कृतीतून त्यांनी समाजातील दांभिकतेला प्रत्यक्ष आव्हान दिले. महात्मा फुले यांचा संघर्ष स्त्रियांच्या प्रश्नांपुरता मर्यादित नव्हता. जातिभेद आणि अस्पृश्यतेच्या अमानुष प्रथांविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली. समाजातील काही घटकांना सार्वजनिक विहिरी, पाणवठे, मंदिरे आणि इतर सार्वजनिक सुविधांचा वापर करण्यास मनाई केली जात होती. अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना माणूस म्हणून मिळायला हवा असा मूलभूत सन्मानही नाकारला जात होता.
जातिव्यवस्थेचे समर्थन करणा-या धार्मिक आणि सामाजिक रूढींची त्यांनी चिकित्सक समीक्षा केली. जन्माच्या आधारावर कोणाला श्रेष्ठ आणि कोणाला कनिष्ठ ठरविण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. प्रत्येक व्यक्तीला समान मानवी प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. समाजातील बहुजन, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांना त्यांच्या शोषणाची जाणीव व्हावी, त्यांनी स्वत:च्या हक्कांसाठी संघटित व्हावे आणि विवेकाच्या आधारावर समाजजीवनाची पुनर्रचना करावी, अशी त्यांची भूमिका होती. या विचारांना संघटित स्वरूप देण्यासाठी त्यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने जातीय वर्चस्व, पुरोहितशाही, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेला विरोध केला. समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळावेत, विवाह आणि इतर सामाजिक विधी अनावश्यक कर्मकांडांपासून मुक्त व्हावेत, तसेच सामान्य माणसाने स्वत:च्या विवेकबुद्धीने जीवन जगावे, हा या चळवळीचा उद्देश होता.
सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी सामाजिक समतेच्या विचाराला संघटनात्मक बळ दिले. विवाहासारख्या महत्त्वाच्या सामाजिक विधींमध्ये पुरोहितांवरील अवलंबित्व कमी करून साध्या आणि खर्चिक कर्मकांडांपासून मुक्त पद्धतीने विवाह करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर विवाह आणि धार्मिक विधींच्या नावाखाली पडणारा आर्थिक भार कमी व्हावा, अशी त्यांची भूमिका होती. सत्यशोधक समाजाने स्त्रिया आणि वंचित घटकांच्या सहभागालाही महत्त्व दिले. महात्मा फुले हे केवळ कृतिशील समाजसुधारक नव्हते, तर प्रभावी लेखक आणि विचारवंतही होते. त्यांच्या लेखनातून सामाजिक विषमता, शोषण, अज्ञान, धार्मिक दांभिकता आणि शेतक-यांची दयनीय अवस्था यांचे वास्तव समोर आले. १८५५ मध्ये त्यांनी ‘तृतीय रत्न’ हे नाटक लिहिले. या नाटकातून त्यांनी शिक्षणाचा अभाव आणि अज्ञानामुळे सामान्य माणसाचे होणारे शोषण अधोरेखित केले. १८७३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘गुलामगिरी’ या ग्रंथातून त्यांनी जातीय शोषणव्यवस्थेवर कठोर टीका केली. या ग्रंथात त्यांनी सामाजिक गुलामगिरीचे स्वरूप स्पष्ट करून शोषित समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला.
‘ब्राह्मणांचे कसब’ या लेखनातून त्यांनी पुरोहितशाहीच्या माध्यमातून सामान्य लोकांची होणारी फसवणूक उघड केली. ‘सत्सार’ या लेखनातूनही त्यांनी सामाजिक प्रश्नांवर विचार मांडले. त्यांच्या लेखनाचा उद्देश केवळ टीका करणे नव्हता, तर समाजाला विचारप्रवृत्त करून परिवर्तनासाठी प्रेरित करणे हा होता. शेतक-यांच्या प्रश्नांविषयी महात्मा फुले यांना विशेष आस्था होती. शेतीवर अवलंबून असणारा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल का राहतो, शेतक-यांच्या श्रमाचे योग्य मूल्य त्यांना का मिळत नाही आणि प्रशासनाच्या धोरणांमुळे त्यांच्या अडचणी कशा वाढतात, या प्रश्नांचा त्यांनी सखोल विचार केला. शेतकरी हा समाजाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असूनही त्याला कर्जबाजारीपणा, दुष्काळ, अवाजवी करभार आणि मध्यस्थांच्या शोषणाला सामोरे जावे लागत होते. शेतक-यांच्या या स्थितीचे वास्तव त्यांनी ‘शेतक-याचा आसूड’ या ग्रंथातून मांडले. १८८३ मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथात त्यांनी शेतक-यांच्या आर्थिक आणि सामाजिक शोषणावर परखड भाष्य केले. शेतीच्या विकासासाठी पाणी, सिंचन, आधुनिक ज्ञान, शिक्षण आणि प्रशासनाची उत्तरदायी भूमिका आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
-डॉ. राजेंद्र बगाटे
मोबा. : ९९६०१ ०३५८२
















