24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहापुरामुळे दाणादाण

महापुरामुळे दाणादाण

मुंबई, पुणे, कोल्हापुरासह कोकण, विदर्भात थैमान
पुण्यात रस्त्याला नदीचे स्वरूप, एनडीआरएफ तैनात

मुंबई/पुणे : प्रतिनिधी
बुधवारपासून क्षणाचीही उसंत न घेता कोसळणा-या पावसाने आज मुंबई, ठाणे, पुणे शहरांसह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने हाहाकार उडाला आहे. पुण्यातील पावसाने कित्येक वर्षांचा रेकॉर्ड तोडला. त्यामुळे शहरात अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. त्यामुळे वाहने पाण्यात बुडाली. तसेच घरांमध्येही पाणी शिरले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. कोकणात मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, महाड शहरात पाणी शिरले आहे. सांगली, कोल्हापुरातही स्थिती बिघडत चालली आहे. आपत्तीला तोंड देण्यासाठी लष्करालाही सज्ज ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दोन आठवड्यांची विश्रांती घेतल्यानंतर शनिवारपासून पावसाने मुंबई, कोकणात ठिय्या मारला. बुधवारी पावसाचा जोर अधिक वाढला व मुंबई, ठाण्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. मुंबईत काही काळ उपनगरीय रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला होता. मुंबई, ठाण्यापेक्षा पुण्यातील स्थिती अधिक गंभीर झाली आहे. मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी शाळांनी सुटी देण्यात आली आहे.
पुण्यात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणातून केलेला पाण्याचा विसर्ग यामुळे भयानक पूरस्थिती उद्भवली असून, पुणे जलमय झाले आहे. पुण्याच्या निंबजनगर, एकतानगर भागात जवळपास ४ ते ४.५ फूट पाणी साचले. तसेच सिंहगड रोड, सहकारनगर, बिबवेवाडी, धनकवडी, बाणेरसह भोसरी भागांतही रस्त्यावरून पाणी वाहात आहे. त्यामुळे रस्त्यावरील शेकडो गाड्या पाण्याखाली गेल्या. कात्रज तलावही तुडुंब भरला आहे. तसेच बरेच नागरिक इमारतीत अडकले. तब्बल ३२ वर्षांनंतर पुण्यात अशी स्थिती निर्माण झाली असून, पुण्यात बचावकार्यात रस्त्यावर बोटी चालवण्याची वेळ आली आहे. अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला. मुसळधार पावसामुळे चौघांना आपला जीव गमवावा लागला.
दरम्यान, पूर परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील काही भागांत दौरा करून पाहणी केली. तसेच प्रशासनही अलर्ट मोडवर असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. नागरिकांच्या बचावासाठी आणि त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडीही तैनात करण्यात आली आहे. खेड, जुन्नर, आंबेगाव, वेल्हा, मुळशी, मावळ, भोर, हवेली तालुके आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर परिसरातील घाट विभागातील शाळांना सुटी देण्यात आलीे.
पुण्यात चौघांचा बळी
डेक्कन भागात अंडा भुर्जीचा स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेत असताना विजेचा धक्का लागून ३ जणांचा मृत्यू झाला. ज्या हातगडीवर धंदा करायचे त्या हातगडीला पुराच्या पाण्यातून वाचविताना ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, ताम्हिणी घाटात एका भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला.

लष्कराची अतिरिक्त पथके सज्ज
लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहेत. एकूण ८५ जणांच्या पथकात लष्करी जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ज्ञ घटकांतील वैद्यकीय पथकाचा समावेश आहे.

बचाव कार्यासाठी सशस्त्र दले तयारीत
लष्करी जवान बचाव आणि मदत कार्यात सहभागी झाले आहेत. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलालाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलेही तयारीत आहेत.

पुरवणी परीक्षा पुढे ढकलली
दहावी व बारावीच्या उद्या दि. २६ जुलै रोजी होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दहावीचा पुढे ढकलण्यात आलेला पेपर ३१ जुलै रोजी तर १२ वीचा पेपर ९ ऑगस्ट रोजी होणार आहे.
मुंबईत मुसळधार
मुंबईत गुरुवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पहाटेपासूनच मुंबईला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे मुंबईही जलमय झाली आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली उल्हासनगर, ठाणे, पालघर, भिवंडी, शहापूर, अंबरनाथमध्ये सखल भागांतही पाणी साचले. तसेच नद्यांना पूर आला. मुंबईतील मिठी, बदलापूरजवळील उल्हास नदी दुथडी भरून वाहात असून रस्ते जलमय झाले आहेत. यामुळे मुंबईतील लोकलचा वेग मंदावला.

कोकणातही पूर
कोकणात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहात आहेत. रायगड जिल्ह्यातील हेटवणे धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहात आहे. सावित्री नदीनेही रौद्ररुप धारण केले आहे. गांधारी नदीलाही पूर आला आहे. तसेच काळ नदीवरील पूलही वाहून गेला आहे. नागोठणे शहरातील आंबा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीतही जोरदार पाऊस कोसळत आहे.

विदर्भातही मुसळधार
पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. भंडारा जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री जोरदार पाऊस कोसळला. यामुळे जिल्ह्यातील आसगावाला पाण्याने वेढा दिला. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची वेळ आली. गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने सायंकाळी जिल्ह्यातील ५० मार्ग बंद करण्यात आले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR