पुणे : प्रतिनिधी
महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटनांमध्ये ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मोक्का) लावण्याचा विचार सुरू आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, कायदेशीर बाबी तपासण्याच्या सूचना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली.
चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित ‘गुरुजन गौरव’ समारंभात अजित पवार यांच्या हस्ते उद्योजक अरुण फिरोदिया, ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर आणि ज्येष्ठ नृत्यांगना शमाताई भाटे यांना गौरवण्यात आले.
पवार म्हणाले, महिलांच्या सुरक्षेबाबत कायदा आणि सुव्यवस्था चोख असावी, यासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले आहेत. अशा प्रकरणांवर कठोर भूमिका घेण्याचा शासनाचा प्रयत्न असतो. कोंढवासारखी प्रकरणं पुढे आल्यानंतर समजतं की वस्तुस्थिती काहीशी वेगळी होती. काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अत्यंत नीच वर्तन करतात, त्यामुळे समाजात अस्वस्थता निर्माण होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पवार म्हणाले, माणसाचे वय कितीही झाले तरी शेवटपर्यंत शिकण्याची गरज असते. आपण सगळं काही जाणतो असं समजण्याचं कारण नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते.
गुरू म्हणजे अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा. आजच्या स्पर्धेच्या काळात गुरू-शिष्य नातं पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पण खरा गुरू शिष्याच्या शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांना घडवतो आणि त्याला योग्य वाट दाखवतो. संघर्षाचा मार्ग शिकवतो, कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देतो.
अरुण फिरोदिया परदेशातील नामवंत संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर भारतात परत आले आणि त्यांनी आपले ज्ञान, कौशल्य आणि दूरदृष्टी देशाच्या प्रगतीसाठी वाहून दिली. मात्र सध्याच्या काळात अनेक विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेतात, यशही मिळवतात, पण भारतात परत येत नाहीत.
‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महा-ज्योती’ यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून शासन त्यांच्या शिक्षणासाठी मदत करते. परंतु परदेशात गेलेले ९० टक्के विद्यार्थी भारतात परत येत नाहीत, तेथेच नोकरी, व्यवसाय करून तिथेच स्थायिक होतात. ही गोष्ट चिंताजनक आहे.
फिरोदिया यांच्या कार्याचा गौरव करताना पवार म्हणाले, त्यांनी केवळ यशस्वी उद्योगसमूह उभा केला नाही, तर नवकल्पनांना चालना देणारे, तंत्रज्ञानप्रेमी, सामाजिकदृष्ट्या जागरूक नेतृत्व निर्माण केले. त्यांनी इतरांसाठीही एक आदर्श घालून दिला आहे. चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवार यांनी तोरणा किल्ल्यावर देखभाल व संवर्धनाचे काम सुरू केले आहे. पुढच्या पिढीला इतिहासाची माहिती मिळावी, यासाठी हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मात्र काही पर्यटक किल्ल्यांवर कचरा करतात, भिंतींवर आपली नावं लिहून त्याचे विद्रुपीकरण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने जे किल्ले बांधले, त्याचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे अशा उपक्रमात अधिकाधिक संस्था पुढे यायला हव्यात, असेही ते म्हणाले.