लातूर : प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान हे राज्यातीलच नव्हे तर देशातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान आहे. कारण हे एक शक्त्तिस्थळ आहे. इथे आल्यानंतर नवी ऊर्जा, नवी शक्त्ती आपल्या सर्वांना मिळते. इथे भरणा-या यात्रेशी आमचे जिव्हाळ्याचे नाते आहे, अशी भावना लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त्त केली.
दरवर्षी प्रमाणेच यंदाही माळेगाव येथे जावून आमदार धिरज देशमुख यांनी खंडोबारायाची मनोभावे पूजा केली. काळ्या मातीत राबणा-या शेतकरी बांधवांसमोरील दुष्काळ हटू दे, त्यांना सुख-समृद्धी लाभू दे, असे साकडे घातले. त्यानंतर दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा यात्रेत सहभागी होवून आमदार धिरज देशमुख यांनी यात्रेकरुंशी, विविध भागांतून आलेल्या भविकांशी, व्यापा-यांशी संवाद साधला. तसेच, यात्रा परिसरातील सुविधांची पाहणी केली. विविध दालनांना भेटही दिली.
आमदार धिरज देशमुख म्हणाले, वेळ अमावस्याची पूजा झाल्यानंतर दरवर्षी मी माळेगाव येथे येतो. ही देशमुख कुटुंबीयांची परंपराच आहे. याआधी आमचे दादा आदरणीय दगडोजीराव देशमुख, माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख हे नित्यनियमाने इथे येत असत. ती परंपरा देशमुख कुटुंबियांच्या वतीने आजही तशीच पुढे सुरु आहे. इथल्या यात्रेला अजून मोठे स्वरूप कसे प्राप्त होईल, त्यासाठी इथे आणखी पायाभूत सुविधा कशा वाढवता येतील, यावर आमचा येणा-या काळात भर असेल, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी समीर राठी, जितेंद्रसिंग पहाडिया, दिमेश बक्रानिया, विमल बक्रानिया, रोहित पाटील, चिराग मिस्त्री, अजय माळी आदी मान्यवर, ग्रामस्थ व देवस्थान पदाधिकारी उपस्थित होते.