35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत प्रचार शिगेला

मुंबईत प्रचार शिगेला

एकूण ६ जागा, ४ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार, २ काँग्रेसकडे

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबईत लोकसभेच्या ६ जागा असून, यापैकी ३ जागांवर शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आहेत. एका मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध भाजप आणि दोन मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे आरोपांची राळ उठली आहे. या मतदारसंघांत पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रचाराचा जोर वाढला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस शिल्लक असल्याने मुंबईतील राजकीय प्रचार शिगेला पोहोचला आहे. मुंबईतील सहापैकी ३ विधानसभा मतदारसंघांत दोन शिवसेनेत लढत आहे. यामध्ये दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाचे राहुल शेवाळे, दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव, उत्तर-पश्चिम मुंबईत ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत आहे. यासोबतच काँग्रेसला मुंबईत दोन जागा मिळाल्या असून, उत्तर मुंबईत काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. येथेही चुरस आहे.

उत्तर-मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात लढाई होत आहे. यासोबतच उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचे संजय दीना पाटील आणि भाजपचे मिहीर कोटेचा मैदानात आहेत. सर्वच मतदारसंघांत चुरस आहे.
यात ईशान्य मुंबईत बहुभाषिक मतदार आहे. या भागात पुनर्विकासाचा मोठा प्रश्न असताना या विषयाला बगल देत सध्या या मतदारसंघात मराठी विरुद्ध गुजराती तर कुठे हिंदू-मुस्लिम असा वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. ईशान्य मुंबईमध्ये मुलुंड, घाटकोपर पूर्वसारखा गुजराती बहुल, तर घाटकोपर पश्चिम, भांडूप, विक्रोळीसारखा मराठी बहुल आणि गोवंडीसारखा मुस्लिम बहुल विभाग आहे.

गुजराती-मराठी वाद हा ईशान्य मुंबईला नवा नाही. मुलुंडमधील सोसायटीमध्ये तृप्ती देवरुखकर यांना कार्यालय देणे नाकारल्याचे प्रकरण असो की मारू घाटकोपर नावाची तोडफोड असो, हा वाद वेळोवेळी समोर येताना दिसतो. आता यावर राजकारणही तापलेले दिसले. बहुभाषिक असलेल्या ईशान्य मुंबईत पुनर्विकास, डोंगराळ झोपडपट्ट्या, आरोग्य असे अनेक मोठे प्रश्न असताना या विषयाला बगल देत सध्या या मतदारसंघात मराठी विरुद्ध गुजराती तर कुठे हिंदू-मुस्लिम असा वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
या मतदारसंघात गोवंडीसारख्या विभागात मुस्लिम मतदार जास्त असल्याने तिथे हिंदू-मुस्लिम वादाला हवा दिली जात आहे. मात्र या विभागातील जनता मात्र मूळ विषयावर प्रकाश टाकताना दिसते तर घाटकोपरमध्ये मराठी आणि गुजराती असे समसमान मतदार असल्याने इथे गुजराती विरुद्ध मराठी वाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे मूळ प्रश्नांना बगल देऊन धार्मिक आणि प्रांतीय तेढ निर्माण करून मतांचे राजकारण करू पाहणा-यांना यावर विचार करणे गरजेचे आहे.

ईशान्य मुंबईत ७ लाख
३३ हजार मराठी मतदार
आकडेवारीप्रमाणे पाहिले तर ईशान्य मुंबईत ७ लाख ३३ हजार ४९३ मराठी, २ लाख ९ हजार ९८९ गुजराती तर २ लाख ४५ हजार ५७५ मुस्लिम मतदार आहेत. हे मतदार येथील उमेदवाराला निर्णायक आघाडी देऊ शकतात. म्हणून ईशान्य मुंबईत हिंदू-मुस्लिम आणि मराठी-गुजराती वाद नेहमीच पाहायला मिळतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR