37.7 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeराष्ट्रीयमुंबईत भाजपचे शक्तिप्रदर्शन

मुंबईत भाजपचे शक्तिप्रदर्शन

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत रोड शो, पारंपरिक वेशात गर्दी
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत घाटकोपर भागात मेगा रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी झालेल्या रोड शोला दुतर्फा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. तसेच पारंपरिक वेशात नागरिक, महिला, वारकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निमित्ताने मुंबईत भाजपचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले.

भाजप महायुतीचे मुंबई उत्तर-पूर्व लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि उत्तर-मध्य मतदारसंघातील भाजपा उमेदवार उज्वल निकम यांच्यासाठी आज मुंबईत रोड शो केला. विक्रोळी ते घाटकोपरपर्यंत लाल बहादूर शास्त्री मार्गावर जवळपास दोन तास चाललेल्या या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच दोन्ही उमेदवार सहभागी झाले होते. पंतप्रधानांच्या रोड शोसाठी या रस्त्यावरील वाहतूक तसेच घाटकोपर-वर्सोवा मेट्रोसेवा पाच वाजल्यापासून बंद करण्यात आली होती. पंतप्रधानाच्या रोड शोच्या निमित्ताने भाजपाने मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रोड शोच्या सुरूवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ््याला नमन केले. त्यानंतर अशोक मिल येथून मेगा रोड शोला सुरुवात झाली. एलबीएस मार्गावरून हा रोड शो पुढे गेला. पार्श्वनाथ मंदिर चौक येथे या रोड शोची सांगता झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या रोड शोसाठी मुंबई भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मुंबईकरांनीही मोदींना बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. भाजपाच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात रोडशोमध्ये सहभागी झाल्या होत्या. मोदींच्या प्रचारवाहनाच्या समोर या महिला कार्यकर्त्या चालत होत्या. यावेळी महाराष्ट्राच्या पारंपरिक फुगड्यांचा खेळही खेळण्यात आला. वारकरी वेषात लोक मोठ्या प्रमाणात होते. ढोल-ताशा पथकांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

या रोड शो दरम्यान एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर खरपूस टीका केली. भाजपाने महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. त्यांना त्यांचे पक्ष सांभाळता आले नाहीत. जे स्वत:चे पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश कसा सांभाळतील व लोक त्यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अजित पवार अनुपस्थित
पंतप्रधान नरेद्र मोदी यांची नाशिक जिल्ह्यात आणि कल्याणमध्ये प्रचारसभा झाली. त्यानंतर मुंबईत घाटकोपरमध्ये रोड शो झाला. मात्र, या रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले नाहीत. प्रकृती अस्वस्थ्यामुळे अजित पवार आज मुंबईत देवगिरी निवासस्थानी आराम करत असल्याची सूत्रांनी माहिती दिली. मात्र, या निमित्ताने उलटसुलट चर्चेला उधाण आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR