हे निधी उभारण्याचे नियमबद्ध व्यासपीठ
मुंबई : प्रतिनिधी
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कामकाजाला आता सोशल स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून नवी दिशा मिळू शकते. सोशल स्टॉक एक्स्चेंज हे सामाजिक आणि लोककल्याणकारी कामांसाठी निधी उभारणीचे नियमबद्ध व्यासपीठ आहे.
या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणा-या पात्र संस्था आणि देणगीदार यांच्यात समन्वय साधता येतो. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या नव्या व्यासपीठाद्वारे मिळणा-या अतिरिक्त मदतीचा लाभ राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. या निर्णयामुळे निधी उभारण्याच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.
विशेषत: वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या निधीची गरज असलेल्या रुग्णांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. तसेच कर्करोग, हृदयरोग, किडनी प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मेंदूविकार आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी अतिरिक्त निधी उभारण्यास मदत होऊ शकते. यातून सीएसआर फंड देणा-या कंपन्या, मोठे देणगीदार, फाउंडेशन, सामाजिक गुंतवणूकदार आणि इतर निधी पुरवठादार यांच्यापर्यंत पोहोचता येते.
देणग्या मिळविण्याचा
पर्याय उपलब्ध होणार
सामाजिक उपक्रमांसाठी देणग्या व गुंतवणुकीच्या माध्यमातून निधी मिळविण्याचा पर्याय उपलब्ध होतो. त्यासोबतच मोठ्या देणगीदारांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. कंपन्यांच्या सामाजिक दायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीचा वापर सामाजिककामांसाठी करण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो.
















