मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवावा. हवं तर मी त्याला पाठिंबा द्यायलाही तयार आहे अशी मागणी उद्धव ठाकरेंकडून सातत्याने होत आहे. मात्र या मागणीवर शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर आता काँग्रेसकडूनही त्याचे समर्थन करण्यात आले आहे.
शरद पवारांच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, शरद पवार चुकीचे काय बोलले, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडीचे संख्याबळ आल्यानंतरच तिथे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जाईल. मविआच्या मेळाव्यात आम्ही उद्धव ठाकरेंच्या मागणीवर बोललोय. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ असे त्यांनी सांगितले.
तर कुणीही मुख्यमंत्रिपदासाठी लढत नाही. जे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत त्यांना आम्हाला सत्तेतून दूर करायचं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही चर्चा करत राहू. जागावाटपात रस्सीखेच होणारच आहे. जर नाही झाली तर कुणाला असं वाटू नये ताकद नाही. प्रत्येक जागा प्रत्येकाने मागितली पाहिजे तरच आम्ही २८८ मतदारसंघांत सर्वांना मदत करू शकतो असे माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितले.
शरद पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्रिपदाचे घोडे कुठेही अडले नाही. निवडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाबाबत निर्णय घ्यायचा असतो. अजून कशाचाही पत्ता नाही. महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असे वातावरण आहे. पण, मुख्यमंत्रिपदाबाबत आताच मांडणी करण्याची आवश्यकता नाही, अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.
उद्धव ठाकरे आग्रही
महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. ज्याची जास्त संख्या त्याचा मुख्यमंत्री असे सूत्र केले तर त्यात पाडापाडी होते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, तुम्ही जे नेतृत्व द्याल त्याला मी पाठिंबा द्यायला तयार आहे अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात मांडली होती. परंतु त्यावर काँग्रेस आणि शरद पवारांकडून सातत्याने नकार देण्यात येत आहे.