23 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमुस्लिम समाजाविषयी ‘गरळ’ ओकणा-या नेत्यांवर अजित पवार नाराज

मुस्लिम समाजाविषयी ‘गरळ’ ओकणा-या नेत्यांवर अजित पवार नाराज

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणा-या नेत्यांकडून मुस्लिम समाजाविषयी करण्यात येत असलेल्या वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
मुस्लिमविरोधी वक्तव्ये करणा-या या नेत्यांच्या भूमिकेचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. याची दखल घेत अजित पवार आता या भाजप नेत्यांविरोधात थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नितेश राणे यांच्यासह भाजपचे काही नेते वारंवार मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. या नेत्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मूळ मतदार आहे, त्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाचा समावेश आहे. अजित पवार आपल्या भाषणांमधून वारंवार आपण अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने आहोत, असा विश्वास देत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेते नितेश राणे सातत्याने मुस्लिम समाजाला अंगावर घेणारी वक्तव्यं आणि आव्हान देण्याची भाषा केली जात आहे. अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत आहेत.

त्यामुळे भाजप नेत्यांच्या मुस्लिम समाजाविषयीच्या वक्तव्यांबाबत अजित पवार यांची भूमिका काय, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून ही बाब त्यांच्या कानावर घालणार आहेत. भाजप नेत्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष द्यावे, असे अजितदादा गटाकडून सांगितले जाणार आहे. या माध्यमातून आपण अजूनही मुस्लिम मतदारांच्या पाठीशी आहोत, असा संदेश देण्याचा प्रयत्न अजितदादा गट करत असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक?
अजित पवार यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण अजित पवार यांचे सोशल मीडिया हँडल्स आणि फेसबुक पेजवरून काही अज्ञात लोकांना फॉलो करण्यात आले आहे. यासंबंधी आम्ही सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती अजितदादा गटाचे प्रवक्ते सूरज पाटील यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR