पुणे : पुरंदर तालुक्यात पुरंदर उपसा जलसिंचन योजना तसेच शेततळ्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी फळबागांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. त्यात मेथी, कोथिंबीर, शेपू, कांदापात, वाटाणा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो आदी पिकांचा समावेश आहे. आता या पिकांचे उत्पादन वाढले असले, तरी त्यांना योग्य दर मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक शेतक-यांना तोटा सहन करावा लागत आहे.
सध्या तालुक्यातील शेतक-यांना मेथी, कांदापात वगळता इतर भाजीपाला तीन-चार रुपये भावाने विकावा लागत आहे. फ्लॉवरला किलोला अवघा दहा रुपये असा नीचांकी दर मिळत आहे. कोबी, टोमॅटो अशा खर्चिक पिकालादेखील समाधानकारक दर मिळत नाही. यामुळे काढणीचा व वाहतूक खर्चही निघत नाही. परिणामी, अनेकदा शेतमाल फेकून द्यावा लागत असल्याचे परिसरातील शेतक-यांनी सांगितले.
उत्पादन खर्चात वाढ
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकांना कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतक-यांना पिकांवर सतत औषध फवारणी करावी लागते. त्यातून उत्पादन खर्च वाढतो. त्यातच सध्या शेतमालाला खूपच कमी बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे परिसरातील शेतकरी सांगत आहेत.