पुणे : प्रतिनिधी
राज्यात सध्या थंडीचा जोर वाढताना दिसून येत आहे. राज्यात सकाळी थंडी, दुपारी उष्णता आणि रात्री पुन्हा थंडी असे वातावरण दिसून येते. आजपासून थंडीचा कडाका आणखी वाढणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एकाच दिवसात किमान तापमानात ४ अंशाने घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आता शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये सातारा, पुणे आणि कोल्हापुरातील घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पुढील २४ तासांमध्ये धुक्याचे प्रमाण वाढणार असून, थंडीचा कडाकाही वाढणार आहे. तसेच नाशिक, निफाडमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. येत्या काळात राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. येथे किमान तापमानाचा आकडा १५ अंशांवर आला आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढत असून, पश्चिम महाराष्ट्रातही तो जाणवत आहे. मुंबई शहर व उपनगरांमध्येही सकाळी आणि रात्री गारठा वाढला आहे.
पुण्यातही सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पडत आहेत. सातारा, पुणे व कोल्हापुरातील घाटमाथ्यावरील परिसरात धुके वाढणार असल्याचा अंदाज आहे. थंडीचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
पुणे गारठले
पुणेकरांना सोमवार (दि. १८) थंडीचा कडाका जाणवला. रविवारी किमान तापमान १८ अंशावर होते, ते आज एकदम १४ अंशावर आले. एनडीए, हवेलीमध्ये तर पारा १२ अंशावर नोंदवला गेला. त्यामुळे पुणेकर थंडीने चांगलेच गारठले.