आर्थिक पाहणी अहवालातील अंदाज, कर्जाचा बोजा ८ लाख कोटींवर!
सेवा, उद्योग क्षेत्रात घसरण, कृषी उत्पन्नात मात्र वाढ
मुंबई : प्रतिनिधी
राज्याचा २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला. यंदा राज्याचा विकास दर ७.३ टक्के अपेक्षित असला तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत तो कमी असणार आहे. चांगल्या पावसामुळे कृषी क्षेत्राचा विकास दर मागच्या वर्षीच्या तुलनेत खूपच चांगला राहणार असला तरी उद्योग आणि सेवा या दोन क्षेत्रांमध्ये गतवर्षाच्या तुलनेत घसरण झाली आहे. राज्यावरील कर्जाचा भार मागच्या वर्षभरात तब्बल १० टक्क्यांनी वाढ झाली असून कर्जाचा भार ८ लाख कोटीपर्यंत गेला आहे.
अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा सन २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर केला. या अहवालानुसार राज्याचा विकासाचा दर या आर्थिक वर्षात ७.३ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशाचा विकास दर ६.५ टक्के अपेक्षित असताना महाराष्ट्राचा विकास दर त्यापेक्षा अधिक राहील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. राज्यात सरासरीच्या ११६ टक्के पाऊस पडला होता. यामुळे कृषी क्षेत्राचा विकास दर यंदा ८.७ टक्के अपेक्षित आहे. मागच्या वर्षी तो साडेतीन टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. उद्योग व सेवा क्षेत्रात मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे. उद्योग क्षेत्राचा विकास दर ४.९ टक्के अपेक्षित आहे. मागच्या वर्षी उद्योग क्षेत्राचा विकास दर ६.२ टक्के होता. तो यंदा आहे. सेवा क्षेत्राचा विकास दरही ८.३ टक्क्यांवरून ७.८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
या आर्थिक वर्षात राज्यावरील कर्जाचा भार ७ लाख ८२ हजार कोटींपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा होती; पण हा आकडा ८ लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे. या वर्षी कर्जाची परतफेड व व्याज देण्यासाठी तब्बल ५६ हजार ७२७ कोटी खर्च अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महसुली तूट दुप्पट वाढणार?
२०२४-२५ साठी राज्याची महसुली जमा ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी रुपये तर महसुली खर्च ५ लाख १९ हजार ५१४ कोटी अपेक्षित होता. वर्षाच्या सुरुवातीला २० हजार कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित होती; परंतु महसुली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ही तूट दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे.
दरडोई उत्पन्नात वाढ
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावर असले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत दरडोई उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. २०२३-२४ मध्ये मध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रुपये होते. त्यात वाढ होऊन यंदा दरडोई उत्पन्न ३ लाख ०९ हजार ३४० रुपये होईल, असा अंदाज आहे. दरडोई उत्पन्नात मराठवाड्यातील जिल्हे शेवटच्या स्थानावर आहेत.
लाडकी बहिण योजनेसाठी
साडेसतरा हजार कोटी
विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेद्वारे जून ३०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत राज्यातील २ कोटी ३८ लाख लाभार्थी महिलांना तब्बल १७ हजार ५०५ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला, अशी माहिती आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आली आहे.
उसाच्या उत्पादनात घट
सन २०२४-२५ च्या खरीप हंगामामध्ये १५७.५९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. २०२४-२५ च्या रबी हंगामामध्ये ६२.८१ लाख हेक्टर क्षेत्रांवर पेरणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया व कापूस यांच्या उत्पादनात अनुक्रमे ४९.२ टक्के, ४८.१ टक्के, २६.९ टक्के व १०.८ टक्के वाढ अपेक्षित आहे. ऊस उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत ६.६ टक्के घट अपेक्षित आहे.