35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeसंपादकीयरामदेवांचे लोटांगणासन!

रामदेवांचे लोटांगणासन!

योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजलि आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी बिनशर्त आणि विनाअट माफी मागितली. पतंजलिच्या उत्पादनांच्या औषधी गुणधर्माविषयी मोठमोठे दावे करणा-या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल हा माफीनामा देण्यात आला आहे. गतवर्षी २१ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या निवेदनाचे उल्लंघन केल्याबद्दल, योगगुुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी दोन स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे सादर करून विनाअट माफी मागितली. पतंजलि आयुर्वेदची बाजू मांडणा-या वकिलांनी यापुढे विशेषत: त्यांनी निर्मिती आणि विपणन केलेल्या उत्पादनांची जाहिरात किंवा ब्रँडिंगशी संबंधित कायद्याचे कोणतेही उल्लंघन होणार नाही, तसेच त्यांच्या वैद्यकीय गुणधर्मांविषयी किंवा कोणत्याही उपचारपद्धतीच्या विरोधात माध्यमांमध्ये कोणत्याही स्वरूपाची सहज विधाने केली जाणार नाहीत अशी हमी सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. पतंजलिवर या हमीचे पालन करणे बंधनकारक आहे असे न्यायालयाने बजावले होते. कोणालाही कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करताना आपल्या उत्पादनात कोणते गुण आहेत, ते इतरांपेक्षा कसे चांगले आहेत, हे सांगण्याचा अधिकार आहे. परंतु असे करताना अन्य उत्पादनांची नावे घेऊन त्यांना बदनाम करण्याचा अधिकार नाही. दुसरी मोठी रेषा ओढून तुम्हाला तुमचा मोठेपणा दाखवता येतो, दुस-यांनी काढलेली रेषा पुसून नव्हे. परंतु हजारो कोटी रुपयांचे ब्रँड झालेल्या पतंजलिला या गोष्टीचे भान राहिले नाही.

याआधी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या उत्पादनाबाबत अनेक गंभीर तक्रारी आल्या होत्या. शासकीय प्रयोगशाळेतील तपासणीत त्यांची उत्पादने निकषानुसार नाहीत, असे आढळले होते. त्यामुळे त्यावर सरकारने कारवाई करावयास हवी होती. परंतु बाबा रामदेव यांच्यावर सरकारचा वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. ‘फेमा’सारख्या कायद्याचा भंग करूनही सरकारने पतंजलिकडे दुर्लक्ष केले. बाबा रामदेव यांच्याविरुद्ध कोविड-१९ च्या अ‍ॅलोपॅथी उपचाराविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अनेक राज्यांमध्ये खटले दाखल करण्यात आले आहेत. म्हणजे बाबा रामदेव आणि त्यांची पतंजलि कंपनी वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही ते, पतंजलि आयुर्वेद आणि त्यांची उत्पादने वादाच्या भोव-यात सापडली आहेत. २०२२ मध्ये पतंजलिच्या गायीच्या तुपात भेसळ असल्याचे उघडकीस आले होते. उत्तराखंडमधील अन्न सुरक्षा विभागाने ही भेसळ उघडकीस आणली होती. हे तूप भेसळयुक्त आणि आरोग्यास हानीकारक असल्याचे प्रयोगशाळेत आढळून आले होते. बाबा रामदेव यांनी या चाचणीला त्यांच्या कंपनीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले होते. पतंजलीच्या नूडल्सबाबतही वाद झाला होता.

२०२२ मध्ये भाजप नेते आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी बाबा रामदेव यांना ‘भेसळखोरांचा राजा’ असे संबोधले होते. उत्तराखंडच्या आयुर्वेदिक आणि युनानी सर्व्हिसेसच्या अधिका-यांनी पतंजलिच्या दिव्या फार्मसीला नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाच औषधांचे उत्पादन थांबवण्यास आणि मीडियामधील जाहिराती काढून टाकण्यास सांगितले होते. राज्य प्राधिकरणाने पतंजलि समूहाच्या बीपीग्रिट, मधुग्रिट, थायरोग्रिट, लिपिडॉम आणि इग्रिट गोल्ड या औषधांच्या उत्पादनावर बंदी घातली होती. दिव्या फार्मसीने या औषधात सुधारणा केल्यानंतर या औषधांच्या निर्मितीला पुन्हा हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. २०२१मध्ये बाबा रामदेव यांच्या कोरोनिल औषधाबाबतही वाद झाला होता. हरिद्वार येथे विकसित करण्यात आलेली ‘कोरोनिल टॅब्लेट’ सात दिवसांत कोरोना बरा करते असा पतंजलिने दावा केला होता. त्याला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने आक्षेप घेतला होता. बाबा रामदेव यांनी मे २०२१ मध्ये अ‍ॅलोपॅथी हे ‘मूर्ख विज्ञान’ असल्याचा आरोप केला होता.

रेमडेसिव्हिर, फेविफ्लू आदी औषधे कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत असाही आरोप केला होता. त्यावर रामदेव यांनी आधुनिक औषधे आणि उपचार पद्धतीवर टीका करू नये असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. २०१६ मध्ये पतंजलिच्या मोहरी तेलाच्या जाहिरातीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पतंजलिच्या कच्छी धनी मोहरी तेलाच्या जाहिराती खोट्या आणि दिशाभूल करणा-या असल्याचा आरोप खाद्यतेल उद्योग संस्थेने केला होता. २०२२ मध्येही पतंजलिचे मोहरीचे तेल राजस्थानमधील गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करत नसल्याचे आढळले होते. २००६ मध्ये मार्क्सवादी नेत्या वृंदा करात यांनी रामदेव यांच्यावर पतंजलिच्या औषधांमध्ये मानव आणि प्राण्यांची हाडे मिसळल्याचा आरोप केला होता. पतंजलिने हे आरोप फेटाळले होते. पतंजलि आवळा रस दर्जेदार नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर लष्कराने आपल्या कॅन्टीनमधून हा रस काढून टाकला होता. २०१८ मध्ये पतंजलिने व्हॉटस्अ‍ॅपशी स्पर्धा करण्यासाठी स्वदेशी मेसेजिंग अ‍ॅप ‘किंभो’ सादर केले होते परंतु काही तासांनंतर ते मागे घेण्यात आले. या अ‍ॅपमधील खासगी माहितीच्या सुरक्षेबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती.

एकूण बाबा रामदेव हे व्यक्तिमत्त्व हरहुन्नरी आणि उचापतखोर दिसते. बाबा रामदेव यांना पतंजलिने औषधी उत्पादनांच्या दिशाभूल करणा-या जाहिरातींच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. गत दोन सुनावण्यांत त्यांना तसा इशारा देण्यात आला होता, समन्स काढण्याचा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर योगगुरू बाबा रामदेव न्यायालयात हजर होते. एखादे चांगले काम केले म्हणजे अन्य कामे चुकीची करायला परवानगी मिळते असे नाही. बाबा रामदेव यांचे योगातील कार्य सलाम करावे असेच आहे, परंतु याचा अर्थ त्यांच्या पतंजलि आश्रमाला काहीही करायला परवानगी मिळेल असे नाही. हमीचे पालन न केल्यामुळे न्यायालयाने त्यांना माफी मागण्यास सांगितले होते. ही माफी पुरेशा गांभीर्याने मागण्यात न आल्याने न्यायालयाने २ एप्रिलला रामदेव व बाळकृष्ण यांची कानउघाडणी केली होती. अखेर त्यांनी मंगळवारी बिनशर्त आणि विनाअट माफी मागितली. बाबा रामदेवांचे हे लोटांगणासन ठरले!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR