30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीय विशेषपश्चिम बंगालमध्ये ‘खेला’ होणार?

पश्चिम बंगालमध्ये ‘खेला’ होणार?

लोकसभा निवडणुकीत ‘चारशे पार’ची घोषणा देत मैदानात उतरलेल्या भाजपने पश्चिम बंगालमधील ४२ पैकी ३५ जागा जिंकण्याचे ध्येय निश्चित केले आहे. दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने देखील अधिकाधिक जागा जिंकण्याच्या प्रयत्नांत यंदा २६ नवीन चेहरे मैदानात आणले आहेत. काँग्रेस आणि डावी आघाडी यांच्यातील जागावाटपाचा ताळमेळ अधांतरीच आहे. या राज्यात सात टप्प्यांत मतदान होत आहे. गतवेळी तृणमूलला २२ आणि भाजपला १८ जागा मिळाल्या होत्या. यंदा संदेशखालीची घटना आणि या प्रकरणी शहाजहाँ शेखसह पक्षाचे अनेक नेते तुरुंगात गेल्याने ममतादीदींची डोकेदुखी वाढली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दाही प्रचारात महत्त्वाचा ठरणार आहे. काँग्रेस आणि डाव्या आघाडीने तृणमूलवर भाजपशी छुपी मैत्री असल्याचा आरोप करत निवडणूक मोहीम सुरू केली आहे. अशा स्थितीत बंगालमधील जनता नेमकी कुणाच्या बाजूने उभी राहते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

देशातील लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला आता उधाण आले आहे. प्रचाराचा ज्वर हळूहळू चढत चालला आहे. विविध राज्यांमध्ये राजकीय समीकरणे बदलत चालली आहेत आणि त्यानुसार पक्षांच्या रणनीती बदलत चालल्या आहेत. देशातील सर्वच राज्यांतील सर्वच मतदारसंघांमधील निवडणुका महत्त्वाच्या असल्या तरी दक्षिणेकडील राज्ये, महाराष्ट्र यांपाठोपाठ पश्चिम बंगालमधील निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २२ आणि भाजपला १८ जागा मिळाल्या होत्या. दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत ‘अब की बार, चारसौ पार’ची घोषणा देत मैदानात उतरलेल्या भाजपने पश्चिम बंगालमधील ४२ पैकी ३५ जागा जिंकण्याचे ध्येय निश्चित केले आहे. दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने देखील अधिकाधिक जागा जिंकण्याच्या प्रयत्नांत यंदा २६ नवीन चेहरे मैदानात आणले आहेत. त्याचवेळी काँग्रेस आणि डावी आघाडी यांच्यातील जागावाटपाचा ताळमेळ अंधातरीच आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलिकडेच कोलकाता भेटीत बंगालमध्ये ३५ जागा जिंकण्याचे ध्येय असल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्चच्या पहिल्या नऊ दिवसांत राज्यांत चार सभा घेतल्या. यावरून भाजप बंगालला अधिक महत्त्व देत असल्याचे लक्षात येते. उमेदवारांची पहिली यादी जारी करण्यातही भाजपने आघाडी घेतली. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच २० जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. अर्थात पुढच्या दिवशी आसनसोल मतदारसंघाचे उमेदवार आणि भोजपुरी गायक पवन सिंह यांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केली. त्यामुळे पक्षाला काही प्रमाणात झटका बसला.
दहा मार्च रोजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील ब्रिगेड मैदानावर एकाच वेळी ४२ उमेदवारांची यादी व्यासपीठावरून जाहीर केली. या यादीत काही धक्कादायक नावांचा समावेश होता. भाजपचे आव्हान लक्षात घेता पक्षाने मागच्या वेळी जिंकणा-या आठ खासदारांना तिकिट दिले नाही. शिवाय काँग्रेसचा गड मानल्या जाणा-या बहरामपूर जागेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्याविरुद्ध क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना मैदानात उतरवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या जागेवर अधीर रंजन हे पाच वेळेस निवडून आले आहेत. ४२ जणांच्या यादीत २६ नवीन चेहरे आहेत.

ममता बॅनर्जी यांनी उमेदवारांची एकतर्फी घोषणा करत पश्चिम बंगालमध्ये ‘एकला चलो रे’ची भूमिका स्पष्ट करतानाच तृणमूल काँग्रेसच भाजपला थेट आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले. हीच गोष्ट त्या जानेवारीपासून सांगत होत्या. तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार, बराच काळ वाट पाहूनही काँग्रेसकडून जागावाटपाबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत आणि नंतरही सहमती न झाल्याने ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
प्रदेश काँग्रेस आणि डाव्या आघाडीचे नेते तृणमूल काँग्रेसवर भाजपशी साटेलोटे असल्याचा आरोप करताहेत. दुसरीकडे डावी आघाडी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना जाहीर होऊनही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. अर्थात, डाव्या आघाडीने देखील १६ उमेदवारांची आणि काँग्रेसने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

वास्तविक, बंगालमध्ये डाव्या आघाडीच्या घटक पक्षांत जागावाटपाबाबत एकमत होऊ शकले नाही. डाव्या आघाडीतील घटक पक्षांनी आपल्या पारंपरिक जागा सोडण्यास नकार दिला आहे. याउलट त्यांनी डाव्यांना इशारा देत म्हटले, एक तर तुम्ही काँग्रेससोबत राहा किंवा आमच्यासोबत. या गोंधळलेल्या स्थितीमुळे जागावाटपाची चर्चा निर्णयाप्रत येऊ शकली नाही.
भाजप आणि तृणमूल यांच्यात ‘कांटे की टक्कर’ सुरू असताना गंगा खो-याच्या मैदानी भागाबरोबरच जंगलमहालचा भाग, उत्तर बंगाल, दक्षिण बंगालचा मतुआबहुल भाग यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मतुआ समुदायाची मते खेचण्यासाठी भाजपने निवडणुकीच्या अगोदर नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला. ही मते निर्णायक समजली जातात.
दक्षिण बंगालच्या पाच जिल्ह्यांतील गंगा खो-याच्या मैदानी भागात लोकसभेच्या १६ जागा आहेत. भाजपने गेल्यावेळी यापैकी केवळ तीनच जागा जिंकल्या. या भागात केंद्रातील प्रस्थापितांविरोधात लाट आणि जुन्या नेत्यांची प्रतिमा पाहता तृणमूल काँग्रेसने सहा नवीन चेहरे आणले. पक्षाची या भागातील स्थिती बळकट आहे आणि विधानसभा निवडणुकीतही त्याची चांगली कामगिरी राहिली आहे.

राजकीय विश्लेषक काय म्हणताहेत?
पश्चिम बंगालमधील राजकीय विश्लेषकांच्या मते, उत्तर चोवीस परगना जिल्ह्यात पक्षाच्या प्रबळ नेत्यांची अटक झाल्याने तृणमूल काँग्रेसच्या गोटात चिंता वाढली आहे. पक्ष संघटना सांभाळणारे मंत्री ज्योतिप्रिय मलिक हे रेशन गैरव्यवहारात तुरुंगात आहेत. कोलकाता आणि हुगळी जिल्ह्यात निवडणुकीची जबाबदारी सांभाळणारे पार्थ चॅटर्जी देखील शिक्षक भरती गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात आहेत. संदेशखालीची घटना आणि या प्रकरणी शहाजहाँ शेखसह पक्षाचे अनेक नेते तुरुंगात गेल्याने तृणमूल काँग्रेसची आणि पर्यायाने ममतादीदींची डोकेदुखी वाढली आहे. संदेशखाली भाग बशीरहाट लोकसभा मतदारसंघात येतो. पक्षाने यंदा विद्यमान खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांना तिकिट दिले नाही. संदेशखाली घटनेच्या वेळी त्यांच्याशी बिनसले होते. वीरभूम आणि लगतच्या जिल्ह्यातील पक्षाच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी घेणारे ‘बाहुबली’ नेते अणुव्रत मंडल देखील पशु तस्करी प्रकरणी तिहार तुरुंगात आहेत.

भाजपची पकड कोठे
उत्तर बंगालमध्ये भाजपची मजबूत पकड आहे. गेल्या वेळी या भागात आठपैकी सात जागा भाजपने जिंकल्या होत्या. तथापि, यावेळी त्यांना अंतर्गत कलहाला सामोरे जावे लागत आहे. दक्षिण बंगालमधील पक्षाची कमकुवत स्थिती हा एक चिंतेचा विषय आहे. विरोधी पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्याशिवाय त्यांच्याकडे मोठा कोणताही चेहरा नाही. जंगलमहल भागात लोकसभेच्या आठ जागा आहेत. मागच्यावेळी भाजपने या ठिकाणी पाच आणि तृणमूलने तीन जागा जिंकल्या होत्या. तत्कालीन काळात सुवेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये होते. २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या भागातील राजकीय समीकरण बदलले. भाजपने कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गांगुली यांना पक्षात सामील करत काही प्रमाणात समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण बंगालमध्ये बनगावव्यतिरिक्त नादिया जिल्ह्यातील दोन जागा रानाघाट आणि कृष्णनगर येथे मतुआ मतदार निर्णायक आहे. हा मतदार भाजपच्या बाजूने आहे.

मुद्यांचा विचार केला तर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा भ्रष्टाचार आणि संदेशखाली प्रकरणांच्या निमित्ताने महिलांंचे शोषण हा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. त्याचबरोबर नागरिकत्व सुधारणा कायद्याचे फायदे सांगत त्याचा प्रचार केला जात आहे. पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवातच मोदींच्या सभेने झाली आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेस देखील केंद्र सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या दुरुपयोगाचा मुद्दा मांडत आरोपाच्या फैरी झाडत आहे. संदेशखाली प्रकरणाचे राजकारण केल्याचाही भाजपवर आरोप केला आहे. त्याचबरोबर महिला आणि सर्वसामान्य लोकांसाठी तृणमूल सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचा देखील प्रचार केला जात आहे. काँग्रेस अणि डाव्या आघाडीने तृणमूल काँग्रेसवर भाजपशी छुपी मैत्री असल्याचा आरोप करत निवडणूक मोहीम सुरू केली आहे. गंगा नदीचे खोरे सोळा जागांमुळे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी तृणमूल काँग्रेसने भाजपच्या तुलनेत आघाडी घेतल्याचे दिसून येते. उत्तर बंगालमध्ये देखील तृणमूल काँग्रेसने पायाखालची घसरणारी जमीन वाचविण्यासाठी आदिवासींसाठी अनेक विकास योजना सुरू केल्या आहेत. त्याचा कितपत परिणाम होईल, हे निकालानंतरच कळेल.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि माकपही निवडणुकीच्या मैदानात आहेत, पण त्यांची व्होट बँक फारशी उरलेली नाही. या राज्यात १३ वर्षांपासून टीएमसीची सत्ता आहे. ममता बॅनर्जी यांच्या लक्ष्मी भंडार आणि कन्याश्री योजनांमुळे महिला खुश आहेत. त्यांनी मुलींना मोफत सायकलीही वाटप केल्या आहेत. २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममतादीदींनी २९४ पैकी ११७ जागा जिंकत या राज्यावरील आपला वरचष्मा दाखवून दिला. तथापि, बंगालमध्ये आता काही प्रमाणात अँटी इन्कम्बसी दिसू लागली आहे. विशेषत: तृणमूलच्या खासदारांविषयी जनतेत नाराजी आहे. मोदींच्या प्रचारसभांना दिसणारी गर्दी ममतांना अस्वस्थ करत आहे. लोकसभेच्या निकालांवरून ममतांचा स्वबळाचा नारा चुकीचा की योग्य हे ठरणार आहे. २०१४ आणि २०१९ च्या मोदी लाटेच्या काळात दीदींनी भाजपचा अश्वमेध या राज्यात फार उधळू दिला नव्हता. यंदा भाजपच्या जागा घटतात की वाढतात यावर भविष्यातील अनेक समीकरणे अवलंबून असणार आहेत.

-सरोजिनी घोष, कोलकाता

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR