36.3 C
Latur
Sunday, May 18, 2025
Homeमहाराष्ट्रराम मंदिर कुणाच्या बापाची जहागीर नाही

राम मंदिर कुणाच्या बापाची जहागीर नाही

व्हीआयपी आमंत्रणावरून जितेंद्र आव्हाड संतापले

मुंबई – अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र राम मंदिर सोहळ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. या उद्घाटन सोहळ्याला कुणाकुणाला निमंत्रित करणार यावर सस्पेन्स आहे. मात्र उद्धव ठाकरे व्हीव्हीआयपी यादीत नाहीत असे विधान भाजपा नेते महाजन यांनी केले. त्यानंतर त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरून सुरू असलेल्या वादात आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत भाजपावर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आमंत्रण दिले असेल तर ही पद्धत भारतात कधीपासून सुरू झाली माहिती नाही. मंदिर कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. ही बापाची मालमत्ता होती तेव्हाच चार्तुवर्ण्य, क्षुद्र जन्माला आले आणि त्यांना देवळाच्या बाहेर उभे करण्यात आले. तुम्ही आजपण आम्हाला देवळाच्या बाहेर उभं करणार?, तुम्ही आजपण आम्हाला आमंत्रण देणार नाही? आणि परत चार्तुवर्णाची निर्मिती होणार.

तुमच्या आमंत्रणाची आणि तुम्ही बोलवण्याची वाट बघणारे आम्ही नाही. आम्हाला जेव्हा जायचे असेल तेव्हा रामाचे नाव घेऊन राम मंदिरात जाऊ. राम कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. आमंत्रण आलं का, ही कुठली नवीन संस्कृती, तुमच्या आमंत्रणाची वाट बघणार नाही. आम्हाला जायचे तेव्हा मंदिरात जाऊ असे त्यांनी सांगितले.

तसेच ज्यादिवशी उद्घाटन होणार त्यादिवशी जाऊ, आम्हाला तुम्ही अडवणार का? बाहेर ठेवणार? आम्ही क्षुद्र आहोत म्हणून आम्हाला मंदिराच्या बाहेर उभं करणार तुम्ही? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून हे सर्व घालवले. काळाराम मंदिरात प्रवेश केला तेव्हाच त्यांनी इशारा दिला. मंदिरापासून तुम्ही रोखू शकत नाही. महाडमध्ये चवदार पाण्याचे आंदोलन केले. हे सर्व बंद करावेच लागेल असा इशारा त्यांनी दिला. संविधानाच्या माध्यमातून हे बंद करून टाकले असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला लगावला.

दरम्यान, देशामध्ये सर्वांना मंदिरे उघडी करणारे बाबासाहेब हवेत की छोटे दरवाजे करून केवळ व्हीआयपी दर्शन हे चालणार नाही. दरवाजे तोडून टाकू. तुम्ही आम्हाला आता रोखू शकत नाही. कायद्याने रोखता येणार नाही. राम मंदिर हे कुणाच्या बापाची जहागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही. एखादे दिवस जे काही थोतांड करायचे असेल ते करून घ्या. निवडणुकीचं वर्ष आले की हे रामाचा बाजार करतात हे अख्ख्या देशाला माहिती आहे. साडेचार वर्षे काहीच काम करायचे नाही आणि शेवटच्या वर्षी राम राम राम करायचे. जनता यांच्यावर राम राम राम म्हणायची वेळ आणणारच आहे असा इशाराही आव्हाडांनी भाजपाला दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR