बंगळूर : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीनंतरच्या सत्तावाटपाच्या सूत्राला चिकटून राहिलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गोंधळ तत्काळ दूर करण्याची विनंती काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे केली. तामिळनाडू दौरा आटोपून दिल्लीला जाण्यासाठी म्हैसूर विमानतळावर राहुल गांधी यांच्याशी स्वतंत्र चर्चेदरम्यान शिवकुमार यांनी राज्य काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाकडे लक्ष देण्याची मागणी केली.
महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही विमानतळावर उपस्थित असताना शिवकुमारांनी राहुल गांधी यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणे पसंत केले. सत्तावाटपासह अनेक मुद्द्यांवर गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांची भेट घेण्याचे प्रयत्न करणा-या शिवकुमार यांनी प्रथमच त्यांच्याशी स्वतंत्र बोलून लक्ष वेधले. म्हैसूर विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काही मंत्री उपस्थित असतानाही त्यांना सोडून विमानतळाच्या दुस-या कोप-यात शिवकुमार त्यांच्याशी काही वेळ बोलले. शिवकुमार यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेता राहुल गांधी यांनी २७ जानेवारीनंतर आपल्या कार्यालयाशी संपर्क साधून वेळ पाहून दिल्लीला यावे, असे शिवकुमारांना सांगितले.
सत्ता हस्तांतरण आणि मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत प्रदेश काँग्रेसमध्ये असलेला गोंधळ सध्या तरी दूर होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. राज्य सरकारला १,००० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त १३ फेब्रुवारी रोजी हावेरी येथे आयोजित साधना मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

