20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्ररुग्णांच्या जीवाशी खेळणारे महाराष्ट्रात रॅकेट

रुग्णांच्या जीवाशी खेळणारे महाराष्ट्रात रॅकेट

बीड : राज्यातील रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडणारी टोळी सक्रिय आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात अ‍ॅझिथ्रोमायसीन-५०० ही गोळी बनावट असल्याचे समोर आले होते.

आता आणखी ‘अ‍ॅमॉक्स’ ही गोळीही बनावट असल्याचे उघड झाले आहे. उत्तराखंडच्या मीस्ट्रॉल फॉर्मुलेशन या कंपनीने याचे उत्पादन केले आहे. राज्यात या बनावट गोळ्यांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी ठाणे येथील विजय शैलेंद्र चौधरी हा सध्या कारागृहात आहे. आता या टोळीत आणखी कोण कोण सहभागी आहेत? याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे.

अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात २५ हजार ९०० बनावट गोळ्यांचा पुरवठा केल्याचे औषध प्रशासनाच्या तपासणीतून समोर आले. त्यानंतर चौघांविरोधात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला. याच तक्रारीत चौघांनी मिळून राज्यात अ‍ॅझिथ्रोमायसीन-५०० या जवळपास ८५ लाख गोळ्यांचा पुरवठा केला आहे.

अंबाजोगाईच्या महाविद्यालयात कोल्हापूरच्या मे. विशाल एन्टरप्रायजेस यांनी पुरवठा केला होता. याच कंपनीने अ‍ॅमॉक्सच्याही दीड लाखाहून अधिक गोळ्या खरेदी केल्या होत्या. त्याचा पुरवठा अंबाजोगाईसह नागपूर, ठाणे, वर्धा येथे पुरवठा केल्याचे सांगण्यात आले. या गोळ्या उत्तराखंडमधील मीस्ट्रॉल फॉर्मुलेशन यांच्याकडून उत्पादित केल्या आहेत. आता याच गोळ्या योग्य ते घटक नसल्याने अप्रमाणित करण्यात आल्या आहेत. यातील आरोपी अद्यापही मोकाटच असून पोलिसांकडून अद्यापतरी तपासाला गती दिल्याचे दिसत नाही.

२०२२ पासून होतोय पुरवठा
मे. विशाल एन्टरप्रायजेसचे सुरेश पाटील यांना संपर्क केला. त्यांनी मागील २७ वर्षांपासून आपण हा व्यवसाय करत आहोत. परंतु अशी फसवणूक पहिल्यांदाच झाली. २०२२ साली आपण विजय चौधरी याच्याकडून औषधी घेतल्याचेही पाटील म्हणाले. परंतु नागपूर, वर्धा आणि ठाणे येथे गोळ्या अप्रमाणित आढळल्यानंतर आपण हा स्टॉक परत घेतल्याचे त्यांचे मत आहे. तसेच अंबाजोगाई रुग्णालयालाही संपर्क केल्याचा दावा केला. अंबाजोगाईत ३३ लाखांचे बिलही थकल्याचे पाटील म्हणाले.

बीडमध्ये शिवसेना आक्रमक
या बनावट गोळ्यांच्या प्रकरणात बीडमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. त्यानंतर पोलिस अधीक्षक, अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनाही निवेदन देऊन याच्या चौकशीची मागणी केली आहे. आठवडाभरात याचा तपास न झाल्यास जिल्हाभर आंदोलनाचा इशाराही सातपुते यांनी दिला आहे.

गोळ्या पुरवठ्याची अशी साखळी
मे. काबीज जेनेरीक हाऊस ठाणे हा बाजारातून बनावट औषधी खरेदी करत होता. तो पुढे मे.अ‍ॅक्वेटीस बायोटेक प्रा. लि. भिवंडी यांना द्यायचा. तेथून मे. फार्मासिस्ट बायोटेक सुरत व मे.विशाल एन्टरप्रायजेस, कोल्हापूर यांना देत असे. कोल्हापूरच्या कंत्राटदाराकडून शासकीय रुग्णालये, वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा केला जात होता. त्यांनी पुरवलेल्या गोळ्यांवर उत्तराखंडच्या मीस्ट्रॉल फॉर्मुलेशन या कंपनीचे नाव आहे.

उपचारासाठी वेळ जातो
अझिथ्रोमायसीन ५०० आणि अ‍ॅमॉक्स हे अँटीबायोटिक आहे. हाडासह इतर वेगवेगळ्या आजारांसाठी या गोळ्या दिल्या जातात. परंतु अप्रमाणित आढळलेल्या गोळयांमध्ये स्टार्च, कॅल्शियम आणि पावडर असल्याचे समजले. त्यामुळे यांच्यापासून काहीही धोका नाही. परंतु या गोळ्या दिल्याने रुग्ण बरा होत नाही. उलट उपचारासाठी वेळ जातो.
– डॉ. अनिल बारकूल, ज्येष्ठ फिजिशियन, बीड

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR