लातूर : प्रतिनिधी
पोलिस रेझिंग डे निमित्त लातूर पोलिस दलातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून विविध चोरींच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले सोने, वाहने व मोबाईल असा सुमारे ४९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत केला. पोलिस दलातर्फे वर्धापन दिनामित्त आयोजित सप्ताहात पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि. ८ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करुन अलीकडच्या काळातील चोरीच्या गुन्ह्याचा तपास करुन चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. लातूर पोलिसांनी विविध गुन्ह्यांची उकल करून गुन्हे उघडकिस आणून गुन्ह्यात चोरीस गेलेला सुमारे ४९ लाख ९ हजार ७५६ रुपयाचा मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत देण्यात आला.
त्यात सोन्याचांदीचे १९ दागिने एकूण १९ लाख ३३ हजार ७४६ किंमतीचे, दुचाकी व चारचाकी २९ वाहने एकूण किंमत १८ लाख ६० हजार, ४५ मोबाईल फोन एकूण रक्कम ४ लाख ५२ हजार किंमतीचे, २ लाख ८ हजार रुपये रोख रक्कम इतर मुद्देमाल असा एकूण रक्कम ४९ लाख ९ हजार ७५६ किंमतीचा मुद्देमालाचे वाटप करण्यात आला. तसेच ज्या फिर्यादींना मुद्देमाल परत मिळाला आहे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन पोलीस दलांचे आभार व्यक्त्त केले. यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर ग्रामीण) सुनील गोसावी, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक (गृह) करन सोनकवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्यासह विविध पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, तपासी अधिकारी, अमलदार, मूळ फिर्यादी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.