39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeलातूररेणा धरणात दीड महिना पुरेल एवढाचा पाणीसाठा

रेणा धरणात दीड महिना पुरेल एवढाचा पाणीसाठा

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर शहरासह अर्ध्या तालुक्याची तहान भागविणा-या रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून या धरणात केवळ ९ टक्केच  जलसाठा शिल्लक राहिला आहे. एक ते दीड महिना पुरेल एवढेच  पाणी सध्या धरणात  उपलब्ध  आहे. जनतेला येणा-या  काळात पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. सध्या प्रकल्पात जे पाणी शिल्लक आहे ते पाणी प्रशासनाने पिण्यासाठीच आरक्षित केले आहे. कडक ऊन पडत असल्यामुळे दररोज १० एमएमने धरणातील  पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. पाण्याने व्यापलेला बहुतांश भाग झपाट्याने कोरडा पडत आहे. तालुक्यात रेणा मध्यम प्रकल्प व व्हटी हे दोन मोठे प्रकल्प आहेत रेणा  प्रकल्पावर दहा खेडी , पानगाव १२ खेडी , कामखेडा पाच खेडी , पट्टीवडगाव खरोळा या गावाच्या नळयोजना अवलंबुन आहेत . सध्या हे दोन्ही प्रकल्प कोरडे पडत आहेत. पिण्याच्या पाण्याचे दुर्र्भीक्ष जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
          रेणा धरणात सध्या ९ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे व्हटी प्रकल्प कोरड पडला आहे त्यामुळे   एप्रील में पर्यंतच  सदरील गावांना पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे . रेणा नदीवरील रेणापूर , घनसरगांव , जवळगा , खरोळा हे चारही बॅरेजेस  सध्या कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . उन्हाची तीव्रता वाढत असल्याने रेणा मध्यम प्रकल्पातील दररोज  १० मिमि ने  बाष्पीभवन होत  आहे .
शिवाय मागील दोन महिन्यात सिंंचनासाठी धरणातील पाण्याचा राजरोसपणे उपसा झाला त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्यााने कमी झाली. सध्या धरणात जे पाणी शिल्लक आहे ते  राखून ठेवले तरच एक दिड महिना जनतेला पाणी मिळेल, अन्यथा जनतेला पिण्याच्या  पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल. ही गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने एक दक्षता समिती स्थापन केली आहे त्यात महसूल, पाटबंधारे, महावितरण व पोलीस प्रशासनाचे अधिकारी  कर्मचारी (भरारी पथक ) सतत लक्ष ठेवून आहेत. हे पथक एक दिवसाड धरण क्षेत्राची पाहणी करीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR