मुंबई : आयपीएल २०२६ मधील दुस-या सामन्यात मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवत हंगामाची विजयी सुरुवात केली. तब्बल १४ वर्षांनंतर मुंबईने स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकत चाहत्यांना मोठी भेट दिली.
प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने दमदार खेळ करत ४ विकेट्स गमावत २२० धावांचा प्रचंड डोंगर उभा केला. मोठे लक्ष्य उभे राहिल्यानंतर मुंबईवर दबाव असणार असे वाटत होते. पण रायन रिकल्टन आणि रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करत सगळे चित्रच बदलून टाकले. २०१२ नंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील आपला पहिला सामना जिंकण्याचा पराक्रम केला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो चांगलाच महागात पडला. सुरुवातीलाच अजिंक्य रहाणे आणि फिन ऍलन यांनी केकेआरला जबरदस्त सुरुवात करून दिली. त्यांनी ६९ धावांची भागीदारी केली. मात्र, ही जोडी शार्दुल ठाकूरने फोडली.
त्यानंतर कॅमेरून ग्रीनलाही त्यानेच बाद केले. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने डाव सांभाळत आक्रमक फलंदाजी केली. त्याने ४० चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी साकारली. पण त्यालाही शार्दुलनेच बाद केले. दुस-या बाजूला अंगकृष रघुवंशीनेही तितक्याच आक्रमक शैलीत फलंदाजी करत २९ चेंडूत ५१ धावा ठोकल्या. अखेरीस रिंकू सिंगने २१ चेंडूत नाबाद ३३ धावा करत संघाचा स्कोअर २२० पर्यंत पोहोचवला.

