मुंबई : प्रतिनिधी
‘लाडकी बहीण’ योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी आता नवीन पर्याय अवलंबण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या आयकर रिटर्न डेटाचा वापर होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’तील लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या आयकर रिटर्न डेटाचा वापर केला जाणार आहे. जेणेकरून केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांपर्यंतच दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ पोहोचेल.
३ जून रोजी केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिवांना आयकर कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत आयटी डेटा मिळवण्याची परवानगी देण्यात आली आहे. विभागाने सध्या २.५२ कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी विशेष समिती नेमली आहे. याअंतर्गत कर भरणा-या किंवा सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जातील.
पूर्वीच्या तपासणीत २ लाख अर्जांपैकी २२८९ सरकारी कर्मचारी लाभार्थी आढळले होते, त्यांची नावं तत्काळ हटवण्यात आली. मंत्री आदिती तटकरे यांनी ही तपासणी वेलफेअर स्कीम्ससाठी आवश्यक आणि नियमित प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. ‘लाडकी बहीण योजना’ २१ ते ६५ वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा एकट्या महिलांसाठी आहे. सध्या ३,७१९ कोटी रुपयांचा निधी मे महिन्यासाठी वितरित करण्यात आला असून २.४७ कोटी महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळाल्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय. ही योजना चालू राहणार आहे. चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत लक्षात आले होते की, सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत. तेव्हापासूनच त्यांना लाभ देणे बंद केले आहे, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले होते. ‘लाडकी बहीण’ योजनेत काही चुका झाल्याची कबुली खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. सरकारी कर्मचा-यांसह पात्र नसलेल्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. निकषांच्या चौकटी मोडून अनेक महिलांनी अर्ज केले होते. आता त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत. निकषांनुसार आता पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी सुरू करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. दर महिन्याला १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होतोय. हे पैसे जमा होण्याची एक ठराविक तारीख अद्याप ठरवण्यात आली नाही. अनेकदा महिना उलटूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होत नाहीत.