29.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeलातूरलातुरात दुकानांना आग, ९ दुकाने खाक

लातुरात दुकानांना आग, ९ दुकाने खाक

मोठी हानी, किराणा दुकानासह कुशन, गिफ्ट सेंटरचा समावेश

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील साळे गल्लीला लागून असलेल्या ६० फूट रोडवरील दुकानांना दि. २३ फेबु्रवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच ही आग भडकल्याने तब्बल ९ दुकाने जळून खाक झाली. या घटनेचे वृत्त समजताच लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु होते. तब्बल ९ दुकाने खाक झाल्याने आगीत मोठी हानी झाली आहे.

६० फूट रोडवर दुतर्फा विविध व्यावसायिक दुकाने आहेत. शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास या रोडवरील पश्चिमेकडील दुकानांना आग लागली. आग एवढी मोठी होती की, काही क्षणात ९ दुकाने या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या आगीत फय्याज यांचे कुशनचे दुकान, शकील तांबोळी यांचे गिफ्ट सेंटर, शहाबोद्दीन मौलाना यांचे बुक स्टॉल, रहीम यांची पानटपरी, किराणा दुकान, स्टेशनरी दुकान, जे. पी. इंजिनिअरिंग, रॉयल डेव्हलपर्स, फर्निचरचे दुकान काही क्षणात जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगण्यात आले.

या संदर्भात लातूर शहर मनपाचे अग्निशमन अधिकारी सुभाष कदम यांनी सांगितले की, रात्री ८.४५ च्या सुमारास उपरोक्त ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने महात्मा गांधी चौकातील एक आणि एमआयडीसीतील ३ अशा चार बंबांना पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे १६ जवान प्रयत्नरत होते. दरम्यान, काँग्रेसचे नेते अ‍ॅड. समद पटेल, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, काँग्रेसचे माजी नगरसेवक युनूस मोमीन यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्यासंदर्भात संबंधितांची संवाद साधला. रात्री उशिरापर्यंत आग रोखण्याचे प्रयत्न सुरू होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR