लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जनाची तयारी करण्यात येत आहे. यावर्षीही मनपाच्या वतीने गणेश मूर्तींचे संकलन केले जाणार असून त्यासाठी १६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले आहे.आयुक्तानी बुधवारी प्रमुख विसर्जन मार्गांची पाहणीही केली. शहरातील प्रभाग क्रमांक २, ३ व ७ साठी नांदेड रस्त्यावर यशवंत शाळा, प्रभाग क्रमांक २ व ३ मधील गणेश भक्तांसाठी विवेकानंद चौकातील पाण्याची टाकी, प्रभाग ५ व १८ साठी मंठाळे नगर मधील मनपा शाळा क्रमांक ९, प्रभाग १ व ८ मधील नागरिकांसाठी सिद्धेश्वर मंदिर, प्रभाग ११ व १२ साठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस शासकीय विहीर तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीजवळ मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.
दयानंद महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये प्रभाग १० व १३ मधील नागरिकांना गणेश मूर्ती देता येतील.सरस्वती कॉलनीतील पाण्याची टाकी येथे प्रभाग १४ व १५ तर टाऊन हॉल येथे प्रभाग ९ तसेच प्रभाग १५ व १६ मधील भक्तांना संकलन केंद्राची सुविधा उपलब्ध आहे.प्रभाग १५ व १७ मधील नागरिकांसाठी बांधकाम भवन तर ६ व १८ या प्रभागातील नागरिकांना कव्हा रोड येथे संकलन केंद्र उपलब्ध आहे. प्रभाग ६ व ७ साठी साळे गल्लीत यशवंत शाळा तर प्रभाग १० व १४ साठी साई रस्त्यावर तिवारी यांच्या विहिरीजवळ मूर्ती संकलन केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. प्रभाग ५ साठी तावरजा कॉलनीतील गणेश नगर तर प्रभाग १० व ११ साठी काशी विश्वेश्वर ग्रीन बेल्ट येथे मूर्ती संकलन केंद्र असणार आहे. प्रभाग ९ साठी अंबाजोगाई रस्त्यावर एसटी वर्कशॉप समोर मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध असेल.
प्रत्येक मूर्ती संकलन केंद्रासाठी प्रत्येकी ५० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. एकूण ९०० कर्मचारी विसर्जनासाठी कार्यरत असतील.मूर्ती वाहून नेण्यासाठी ४५ आयशर वाहने,४ क्रेन, २ जेसीबी तसेच विसर्जन तलावाच्या ठिकाणी २० प्रशिक्षित पोहणारे कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाचे २० प्रशिक्षित कर्मचा-यांचे पथक वाहन व यंत्रणेसह उपलब्ध राहणार आहे. प्रत्येक मूर्ती संकलन केंद्रावर घरगुती ४ फुटापर्यंतच्या मूर्ती संकलित केल्या जाणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मोठ्या मूर्ती स्वत:च्या वाहनाने १२ नंबर पाटी येथे विमानतळ रस्त्यावर आणून दिल्यास मनपाच्या वतीने आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देत त्यांचे विसर्जन करता येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मूर्ती या ठिकाणापर्यंत आणून देत महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. बुधवारी मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, उपायुक्त वसुधा फड यांनी प्रमुख विसर्जन मार्ग तसेच मूर्ती संकलन केंद्रांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.
















