31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeसोलापूरलेकीच्या विजयासाठी शिंदेंची रणनिती

लेकीच्या विजयासाठी शिंदेंची रणनिती

रणजित जोशी : सोलापूर
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होत असून आमदार प्रणिती शिंदे विरूध्द राम सातपुते हा सामना रंगतदार होत चालला आहे.

सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपला प्रदीर्घ राजकीय अनुभव पणाला लावत आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी तगडी रणनिती आखली आहे. भाजपला घेरण्यासाठी शींदे विविध चाली रचत असून एकएक प्यादा मीळवत सारीपाटाचा डाव जींकण्याची शिंदेंची रणनिति आहे.याआधीच्या पराभवाच्या कारणांचा अभ्यास करून मागील चुका टाळत शिंदे डाव टाकत आहेत. विविध राजकीय नेते, पदाधिकारी यांना एकत्र करण्यात ते यशस्वी होत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सोलापुरात तर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची पंढरपुरात जाहीर सभा झाली. त्यामुळे राजकीय वातावरण तापवण्यात शिंदे यशस्वी झाल्याने काँँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

आमदार, राज्याचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, खासदार, राज्यपाल,केंद्रीय ऊर्जामंत्री, केंद्रीय गृहमंत्री अशा मोठ्या पदापर्यंत सुशीलकुमार शिंदे यांनी झेप घेतली. या पदांच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर लोकसभा आणि जिल्ह्याचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. उजनी-सोलापूर जलवाहिनी, सोलापूर विद्यापीठ, बोरामणी विमानतळ, एनटीपीसी व पॉवर ग्रीड ऊर्जा प्रकल्प, बीएसएफ व सीआयएसएफचे केंद्र मंजूर केले.प्रत्येक तालुक्यात दिलेला विकास निधी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, २०१४ मध्ये मोदी लाटेत शिंदेंचा धक्कादायकरीत्या पराभव झाला. पाठोपाठ २०१९ मध्ये मतविभागणीमुळे त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. सलग दोन पराभव झाल्याने तिस-यांदा पराभव होऊ नये यासाठी त्यांनी मोठी काळजी घेतली आहे. अत्यंत सूक्ष्म पद्धतीने तळागाळापर्यंत जाऊन आपल्या कन्येसाठी ते प्रचार यंत्रणा राबवित आहेत.
सोलापूर शहर आणि मतदारसंघातील सहा तालुक्यातील राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उध्दव ठाकरे गट), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टीच्या सर्व नेत्यांना एकाच व्यासपीठावरून आणण्याची किमया त्यांनी साधली आहे. त्यामुळे सर्व नेतेमंडळी प्रणिती शिंदे यांचा प्रचार करीत आहेत. शिवाय काँग्रेस सोडून गेलेले सगळे नेतेही शिंदे यांच्या प्रचारात दिसत आहेत.

वंचित बहुजन आघाडीमुळे मत विभागणी अटळ होती. वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली. शिवाय एमआयएमनेसुद्धा आपला उमेदवार या निवडणुकीत दिला नाही. त्यामुळे मत विभागणी टळली आहे. या सगळ्या घडामोडीत सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका महत्त्वाची होती अशी चर्चा आहे. एका अर्थी धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यामध्ये शिंदे हे यशस्वी झाले आहेत. विविध बैठका, पदयात्रा आणि सभांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. पन्नास वर्षांचा राजकीय अनुभव, विविध डावपेचांची असलेली जाण, विविध राजकीय परिस्थितीत केलेल्या संघर्षातून मिळालेले अनुभवाचे बोध, पराभवाच्या भट्टीतून शेकून आलेले कटू अनुभव, कोणता नेता कसा आहे, त्याच्या मागे किती जनता आहे याची घेतलेली सखोल माहिती, गावागावात, शहरात आणि तालुक्यात कोणत्या नेत्याला जवळ केल्यास कोणत्या नेत्याला ताकद दिल्यास मते मिळतील याचा घेतलेला अचूक अंदाज यामुळे प्रणिती शिंदे यांच्या प्रचारसभा यशस्वी होत आहेत. शिवाय काँग्रेसच्या जुन्या जाणत्या आणि पक्षात सक्रिय नसलेल्या नेतेमंडळींनासुद्धा या निवडणुकीत शिंदे यांनी सक्रिय केले आहे. याचाही फायदा प्रणिती यांना होत आहे.प्रणिति शिंदे या सुध्दा मतदारसंघ पिंजून काढत आहेत.योग्य पध्दतीने प्रचारात मुद्दे मांडत त्या भाजपवर तोफ डागत असून आक्रमक प्रचार करत आहेत.

भाजपला फाजील आत्मविश्वास लढणार?
भाजपच्या मागील दोन खासदारांवर व आमदारांवर असलेली जनतेची नाराजी, आमदारांमधील समन्वयाचा अभाव, सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांमधील नाराजी,सातपुते यांच्या प्रचार यंत्रणेतील विस्कळीतपणा याचा फटका राम सातपुते यांना बसत असून मोदींच्या जीवावर आपण निवडून येऊ हा भाजपचा फाजील आत्मविश्वास भाजपची नौका पराभवाच्या गर्तेत डुबवण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR