25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरलोकशाहीच्या आडून हुकूमशाही चालविली जात आहे : ॲड. असीम सरोदे

लोकशाहीच्या आडून हुकूमशाही चालविली जात आहे : ॲड. असीम सरोदे

बार्शी : संविधानातील आम्ही भारतीय लोक म्हणजे गणराज्य व संघराज्य आहे. त्यामुळेच संविधानातील कलम एक मध्ये इंडिया म्हणजे भारत सगळ्या राज्यांचे एक संघराज्य असेल असे म्हटले आहे. येथील गण म्हणजे नागरिक आपले लोकप्रतिनिधी निवडून देतील व संघराज्य कारभार चालावा ही संविधानाची रचना मान्य नसलेले राजकीय नेते एककेंद्री सत्ता निर्माण करून लोकशाहीच्या आडून हुकूमशाही चालवीत आहेत असे परखड मत संविधान विश्लेषक ॲड. असीम सरोदे यांनी मांडले.

संविधान जागृती अभियान आयोजित यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह, बार्शी येथे ‘संविधानातील आम्ही भारतीय लोक’ या विषयावर ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. काकासाहेब गुंड होते.मनीष देशपांडे आणि कृतार्थ शेवगावकर यांनी निर्मिती केलेला भारतीय संविधान उद्देशिका – तक्ता याचे प्रकाशन ॲड.असिम सरोदे यांच्या हस्ते झाले.

ॲड. असीम सरोदे पुढे म्हणाले की, वृत्तपत्र-माध्यमे, जाहिराती यांचा वापर खोटे चित्र निर्माण करण्यासाठी मायावी प्रयोग म्हणून होतो आहे त्यामुळे स्वार्थी राजकारण्यांना कुणी नागरिक नकोत तर मतदार हवेत. असत्यच सत्य म्हणून बिनधोकपणे वावरू शकेल, महत्वाच्या पदावर बसून जनतेचा पैसा उधळू शकेल अशी सोय तयार करून देणारे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण नासवले आणि आज एकनाथ शिंदे यांचे संविधानिक नैतिकता उधळून टाकणारे सरकार राज्यात आहे असा थेट आरोप करून ॲड. असीम सरोदे म्हणाले की, आता अत्यंत प्रामाणिक संविधानिक विचार करणारे नागरिक राज्यातील सत्ता बदल घडवून आणतील. लोकशाही हवी, लोकसहभाग हवा पण आम्ही राजकीय विचार करणार नाही असा विचार करणे नागरिकांनी सोडले पाहिजे असा सल्ला ॲड. सरोदे यांनी दिला.

स्त्रियांवरील अत्याचार व हिंसेला धर्मांध व राजकीय फायद्यासाठी राजकारणाचे माध्यम बनविले जातेय याबाबत दुःख व्यक्त करून ॲड. श्रीया आवले म्हणाल्या की ,आम्ही असीम सरोदे सरांच्यासोबत अनेक जनहित व पर्यावरण हित याचिकांमधून मूलभूत परिवर्तन घडवून आणण्यासाठी वकिली करतो, कौटूंबिक केसेस, घट्स्फोट व फौजदारी केसेस मधून नवीन दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न प्रचलित न्यायव्यवस्थेत आम्ही करतो अशी माहिती यावेळी ॲड.श्रीया आवले यांनी दिली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुमित खुरंगळे, आकाश दळवी, विवेक गजशिव, उमेश नेवाळ, मनिष देशपांडे, डॉ. अशोक कदम, डॉ. दिलीप कदम तसेच सर्व संविधान प्रेमी व्यक्ति, संस्था आणि संघटना यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता देव यांनी केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR