23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरवाहून गेलेला कासेगावचा युवक अद्याप बेपत्ताच

वाहून गेलेला कासेगावचा युवक अद्याप बेपत्ताच

सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुक्यात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने उळे- कासेगाव रस्त्यावरील ओढ्यास मोठा पूर आला होता. या पुरात मंगळवारी रात्री दुचाकी वरील तिघेजण दुचाकीसह वाहून गेले होते. त्यापैकी दोघे बचावले पण दुचाकीसह तिसरा युवक वाहून गेला.

बुधवारी (दि. १२) सकाळच्या सुमारास जिल्हा प्रशासनामार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये वाहून गेलेली दुचाकी सापडली, परंतु तब्बल १२ तास शोधमोहीम घेवूनही तो बेपत्ता युवक सापडला नाही. यामुळे पुन्हा आज गुरूवारीही शोधमोहीम होत असल्याची माहिती दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली. दरम्यान, या शोधमोहीमेसाठी कासेगावचे काही युवक आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बबन जाधव आणि महादेव रेड्डी हे पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना त्यांनी झाडांना पकडून स्वतःला वाचविले तर ज्ञानेश्वर संभाजी कदम हा युवक अद्याप बेपत्ता आहे. ही माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांना मिळताच ते घटनास्थळी लागलीच दाखल झाले. त्यांनी सोलापूर महापालिकेची फायर फायटर टीम बोलावली. पंढरपूरहून एक बोट मागवून या युवकाचा शोध घेतला. इतकेच नाहीतर कासेगावच्या काही युवकांनी आणि ग्रामस्थांनीही या शोधमोहिमेत तालुकाप्रशासनास मोलाची मदत केली.

बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत या युवकास शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. तब्बल १२ तास तहसीलदारही घटनास्थळीच होते. मात्र तो वाहून गेलेला युवक अद्याप सापडला नाही. तहसीलदार जमदाडे यांनीही काटे- चिखलाचीही पर्वा न करता शोधमोहिमेत सहभाग नोंदविला. सायंकाळी ६ नंतर अंधार पडू लागल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या परवानगीने ही मोहीम थांबविली. पुन्हा ही शोधमोहीम सुरू असल्याची माहिती तहसीलदार जमदाडे यांनी दिली. ओढा पावसाळ्यात भरून वाहत असताना लोकांनी या मार्गाने अजिबात ये-जा करू नये, इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असेही आवाहन तहसीलदार जमदाडे यांनी ग्रामस्थांना केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR