पुणे : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या २७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. यातील एक जागा पुण्याला मिळावी यासाठी महायुतीमधील दोन प्रमुख पक्ष आग्रही आहेत. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांत या एका जागेसाठी जोरदार स्पर्धा पहायला मिळत आहे. भाजपकडून जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादी (अजित पवार) कडून शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
या दोघांपैकी एकाचे नाव विधान परिषद सदस्यत्वासाठी निश्चित होते का, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. या सभागृहातील पाच जागा रिक्त झाल्या आहेत. यातील तीन जागा भारतीय जनता पक्षाच्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे ) यांची प्रत्येकी एक जागा रिक्त झाली आहे. पुण्याची जागा अजित पवार गटाला गेली तर त्यांच्याकडून दीपक मानकर हे उमेदवारीच्या स्पर्धेत सर्वांत पुढे आहेत.
मुळीक यांना मिळणार संधी?
जगदीश मुळीक हे भाजपचे शहराध्यक्ष असून माजी आमदार आहेत. विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये एकत्रित राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी त्यांचा पराभव केला होता. २०२४ च्या निवडणुकीत महायुतीमध्ये सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार असल्यामुळे जगदीश मुळीक यांचे तिकिट कापण्यात आले. त्यांची लोकसभा लढवण्याचीही इच्छा होती. मात्र पक्षाने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा विजय देखील झाला. नोव्हेंबर २०२४ मध्ये वडगावशेरीची जागा अजितदादा गटाला सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जगदीश मुळीक यांना विधान परिषदेचा शब्द दिला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस शब्द पाळणार का, याची सध्या पुण्यात चर्चा रंगली आहे.
अजित दादा मानकरांचा मान राखणार
दीपक मानकर यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार, याची चर्चा विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील झाली होती. तेव्हा विधान परिषदेच्या जागेसाठी रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातील सोशल मीडिया वॉर देखील झाले होते. तेव्हा मानकरांची संधी हुकली. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीची एक जागा रिक्त झाली आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दीपक मानकर यांनी अजित पवारांची साथ दिली. मानकर हे अजित दादांचे निकटवर्तीय मानले जातात. अजित पवारांनी त्यांना पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. आता त्यांना आमदार होण्याची इच्छा आहे. त्यांनी एक निवडणूकही लढवली होती, मात्र त्यात त्यांना यश मिळाले नव्हते. आता मात्र त्यांनी एका जागेसाठी जोर लावला आहे. त्यांच्या समर्थकांनी लॉबिंग देखील सुरू केले आहे.
मराठवाड्याला संधी मिळणार?
विधान परिषदेतील पाच सदस्य हे नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे पाच जागा रिक्त झाल्या आहेत. यातील एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, तर तीन भारतीय जनता पक्षाच्या आहेत. अजित दादांच्या पक्षाचे मराठवाड्यातील परभणीचे राजेश विटेकर हे विधानसभेवर विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे. ही जागा मराठवाड्यातूनच भरली जाणार की पुण्यातील कार्यकर्त्याला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.