लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना, निवळी व प्राथमिक अरोग्य केंद्र निवळी यांचे संयुक्त विद्यमाने ऊस तोडणी मजुर व वाहतूक ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील शिबिरामध्ये ऊसतोड मुजरांनी व कर्मचा-यांनी मोठया संख्येने सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, रक्तातील साखरेचे प्रमाण, इसीजी, एचआयव्ही, धनुर्वात लसीकरण, बालचिकीत्सा व इतर आजार याची सेवा देण्यात आली. या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. रक्तदाब, मधुमेह, रक्तातील साखरेचे प्रमाण तसेच इतर आवश्यक आरोग्यविषयक तपासण्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची प्राथमिक माहिती घेण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेतल्या. आवश्यकतेनुसार रुग्णांना वैद्यकीय सल्ला, औषधोपचार आणि पुढील तपासणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. साखर कारखान्यात काम करणा-या कामगारांना तसेच ऊसतोडणी मजूर व वाहतूक ठेकेदार यांना अनेकदा कामाच्या व्यापामुळे स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
तसेच ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही विविध कारणांमुळे नियमित वैद्यकीय तपासणी करणे शक्य होत नाही. अशा मजुर व कर्मचारी यांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश असून याच सामाजिक जाणिवेतून विलास सहकारी साखर कारखाना, निवळी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. अनेक मजुर व कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याच्या तक्रारी मांडून त्यावर योग्य वैद्यकीय मार्गदर्शन घेतले. आरोग्य तपासणीबरोबरच आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय, आहारातील आवश्यक बदल आणि दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयींचा अंगीकार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विलास सहकारी साखर कारखाना, निवळी यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा आरोग्यविषयक उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला. सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक आणि औद्योगिक विकासापुरते मर्यादित नसून समाजातील सर्वसामान्य घटकांच्या आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक उन्नतीसाठीही योगदान देऊ शकते, हे या उपक्रमातून दिसून आले. या शिबीराचे उद्घाटन संचालक अनंत बारबोले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक कार्याकरी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले, कार्यक्रासा तज्ञ डॉ. पलंगे, डॉ. शिला टेकाळे, डॉ. रचना शिंदे व त्यांचे कर्मचारी, तसेच खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी व ऊसतोडणी मजुर माठ्या संखेने उपस्थीत होते.
















