लातूर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना लि. युनीट-२ या कारखान्याच्या सन २०२४-२५ या हंगामाचा गळीत हंगाम शुभारंभ दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी झाला असून संस्थापक तथा माजी मंत्री आमदार अमित विलासराव् देशमुख यांनी केलेल्या सुचनेनुसार विलास, युनीट-२ येथील कार्यकारी संचालक, खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य नियोजन करून कारखान्याची प्रती दिन गाळप क्षमता २५०० मे. टन असताना दि. २० जानेवारी रोजी एका दिवसात ४३१० मे.टन उच्चांकी गाळप करून एक विक्रम प्रस्थापीत केला आहे. या कारखान्याने ६४ दिवसांत २.४३ मेट्रीक टन गाळप केले आहे.
या कारखान्याने दि.२० जानेवारीअखेर ६४ दिवसांत १५२ टक्के गाळप क्षमतेचा वापर करुन प्रती दिन सरासरी ३८०५ मे. टन याप्रमाणे २.४३ लाख मे. टन उच्चांकी गाळप केले असून बी-हेवी व सिरफ डायव्हर्शनसह अंदाजे ११.८५ टक्के साखर उता-यासह २३९३०० क्वि. साखर उत्पादीत केली आहे. तसेच आसवणी प्रकल्पाची ६० के. एल. पी.डी. क्षमता असताना दि. २० जानेवारी रोजी ९०९०६ ब. ली. आर. एस. व ९२०१६ ब. लि. ईथेनॉलचे उच्चांकी उत्पादन केले आहे.
लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टिकोणातून विकास मार्गातील शेतकरी हा केंद्र बिंदू मानून माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार धिरज विलासराव देशमुख तसेच कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विलास सहकारी साखर कारखाना लि. युनिट-२ सन २०१४ पासून गाळप चालू करून कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल चालू असून कारखान्याने आगदी अल्पावधीत प्रत्येक क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे.
विकासाचा दुसरा टप्पा म्हणजे कारखान्याचा आसवणी प्रकल्प कार्यान्वीत झाला असुन हाच विकासाचा मार्ग निरंतर चालत राहील. तसेच प्रत्येक हंगामात ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त ऊस दर दिलेला आह. त्यामुळे जळकोट, उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, चाकुर तालुक्यातील ऊस उत्पादकांमधून विलास सहकारी साखर कारखाना लि. युनिट-२ च्या माध्यामातून ऊस उत्पादकांच्या जिवनात प्रत्यक्षात अच्छे दिन आल्याची भावना व्यक्त होत आहे. यावरुन श्रेध्देय विलासराव देशमुख यांनी उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे यांनी दिली.
हंगामात विलास सह. सा. कारखाना युनीट-२ कारखान्याची प्रती दिन २५०० मे. टन गाळप क्षमता असताना आवघ्या ६४ दिवसात २ लाख ४३ हजार मे. टन ऊसाचे गाळप करून प्रकल्पाच्या कार्यक्षमतेचा जवळपास १५० टक्के वापर करून स्पीरीट आणि ईथेनॉलचे उच्चांकी उत्पादन केल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांचेसह वर्क्स मॅनेजर कोळगे, चिफ केमिस्ट खरात, मुख्य शेतकी अधिकारी मोकाशे, चिफ अर्कोटंट चांडक, डिस्टीलरी मॅनेजर शेख, पर्चेस ऑफीसर डी. जी. पाटील, विभागप्रमुख, कर्मचारी, कामगार व ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार व ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख व कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले व हंगामाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.