सोलापूर : एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण विभागाने शाळाबाहय मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी मोहीम राबविली. या मोहिमेमुळे शाळांशाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी घरोघरी, वाड्यावस्त्यांवर व शहरातील विविध चौकांत, गल्लीबोळात दिसून आले. तुमच्या घरात लहान मुलं आहेत का? ते शाळेला जातात की नाही ओ ताई, असा प्रश्न सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांनी विचारला असता समोरून पालकांनी योग्य तो प्रतिसाद दिला.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदणी व्हावी, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. ऊसतोडणी, वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजूरी, बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामांसाठी पाल्यासह कुटुंबे स्थलांतरण करीत असल्याने ६ ते १५ वयोगटातील अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहतात.
अशा स्थलांतरित, शाळाबाहय बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे. ऊसतोडणी, वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामांसाठी पाल्यासह कुटुंबे स्थलांतरण करीत असल्याने ६ ते १५ वयोगटांतील अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरेगाव येथील वीटभट्टी परिसरात गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांनी वीटभट्टी, चुनाभट्टी व मेंढपाळांशी संवाद साधला. यावेळी कुमठे केंद्राचे केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे, शिक्षक सुरेश चव्हाण, किरण राठोड आदी उपस्थित होते. जमादार यांनी लोकांशी संवाद साधत शाळाबाहय मुलांचा शोध घेतला.
शाळाबाहय मुलांचे सर्वेक्षणात दिसून आलेल्या बाबी व माहितीवरून अहवाल तयार करण्यास शाळांना सूचना केल्या आहेत. हा अहवाल केंद्रस्तरावरून पंचायत समिती स्तरावर पोहोचणार आहे