27.2 C
Latur
Tuesday, July 22, 2025
Homeसंपादकीयशुभांशूचे शुभागमन

शुभांशूचे शुभागमन

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातील १८ दिवसांची यशस्वी मोहीम पूर्ण करत सुखरूपपणे पृथ्वीवर परत येत इतिहास रचला. त्यांच्यासोबत अमेरिकेच्या मिशन कमांडर पंगी व्हिटसन, पोलंडचे स्लवोज उज्नान्स्की-बिस्नीव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे तीन अंतराळवीरही सुखरूप परतले. चारही अंतराळवीरांना घेऊन येणा-या ‘ग्रेस’ या ड्रॅगन यानाचे कॅलिफोर्नियाच्या किना-याजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग झाले. ‘ऑक्सिओम-४’ या खासगी अंतराळ मोहिमेद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे शुभांशू शुक्ला हे पहिले भारतीय ठरले. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेलेले शुभांशू दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले. भविष्यातील भारताच्या ‘गगनयान’ मोहिमांच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. १९८४ साली राकेश शर्मा हे अंतराळात गेले होते. शुक्ला हे पृथ्वीवर आल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी लँडिंग प्रक्रियेचे ठिकठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. शुभांशू अंतराळयानातून स्मितहास्य करत बाहेर पडल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांसह देशवासियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अंतराळाला कवेत घेणा-या भारतमातेच्या या सुपुत्रावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३.०१ वाजता शुभांशू यांचे यान पृथ्वीवर दाखल झाले. सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ते अंतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाले होते.

शुक्ला यांनी पृथ्वीवर पाऊल ठेवल्यानंतर सा-या देशात उत्साहाचे वातावरण होते. लखनौमधील त्यांच्या कुटुंबियांनीही जल्लोष केला. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे शुक्ला हे पहिले भारतीय ठरले असून कामाप्रति असलेल्या कटिबद्धतेमुळे आणि साहसाने अब्जावधी लोकांच्या स्वप्नांना प्रेरणा दिली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्ला यांचे समाजमाध्यमावर स्वागत केले. शुभांशू शुक्ला केवळ अवकाशात जाऊन आले नाहीत, तर त्यांनी भारताच्या महत्त्वाकांक्षा नव्या उंचीवर नेऊन ठेवल्या आहेत. हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली. राजनाथसिंह लखनौचे खासदार आहेत. त्यांनी शुक्ला यांच्या वडिलांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाल्या, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे मनापासून स्वागत. त्यांचे योगदान भारताच्या अवकाश मोहिमांमधील तसेच विज्ञान-तंत्रज्ञानामधील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या बाबतीत एक मैलाचा दगड ठरला आहे. मोहिमेत सहभागी सर्वांचे अभिनंदन!

या मोहिमेसाठी भारताने सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांचा खर्च केला आहे. ऑक्सिओम स्पेस, नासा आणि इस्रो यांच्या संयुक्त सहकार्यातून ही मोहीम यशस्वी करण्यात आली. २५ जून २०२५ रोजी फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन-९ रॉकेटच्या माध्यमातून या मोहिमेला सुरुवात झाली होती. २८ तासांच्या प्रवासानंतर २६ जून रोजी ग्रेस यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडले गेले. १८ दिवसांच्या मोहिमेनंतर १४ जुलै रोजी ग्रेस यान आयएसएसपासून वेगळे झाले. त्यानंतर सुमारे २२.५ तासांचा परतीचा प्रवास पूर्ण करून १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता यान यशस्वीरीत्या समुद्रात उतरले. ५.७ किमी उंचीवर ड्रोग पॅराशूट आणि २ किमी उंचीवर मुख्य पॅराशूट व्यवस्थित उघडल्यामुळे लँडिंग अधिक सुरक्षित झाले. या मोहिमेदरम्यान शुभांशूने ३१० हून अधिक वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घातली आणि १.३ कोटी किमीपेक्षा अधिकचा अंतराळ प्रवास केला. त्यांनी ३०० हून अधिक सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवले.

६० पेक्षा अधिक वैज्ञानिक प्रयोगात भाग घेतला. त्यात भारताचे सात महत्त्वाचे प्रयोगही होते. शून्य गुरुत्वाकर्षणावर मेथी व मूग बियांचा उगवण प्रयोग विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. शुक्ला यांच्या पुनरागमनानंतर त्यांची व त्यांच्या सहका-यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. गुरुत्वाकर्षणाशी शरीर जुळवून घेण्यासाठी त्यांना ७ ते १० दिवस रिहॅबिलिटेशन प्रक्रियेत ठेवले जाईल. त्यानंतर शुक्ला यांचे भारतात आगमन होण्याची शक्यता आहे. ऑक्सिओम-४ मिशन हे भारताच्या ‘गगनयान’ कार्यक्रमासाठी तसेच स्वदेशी अंतराळ स्थानक उभारणीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या मोहिमेमुळे भारताने मानवी अंतराळ मोहिमांच्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला आहे. चार दशकांनंतर भारतीय अंतराळवीराने आयएसएसवर काम केल्याने ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात सॅलड बियाणे उगवण्याचा प्रयोग केला आहे. खाद्यपिकांच्या बियाणांवरील मायक्रोग्रॅव्हिटीचा परिणाम, मायक्रोगॅ्रव्हिटीमध्ये मानवी संवाद विश्लेषण, स्नायू पुनरुत्पादनावर चयापचय पूरकांचा परिणाम, सायनोबॅक्टेरियाच्या वाढीचा अभ्यास आदी प्रयोग त्यांनी केले आहेत. शुक्ला यांनी मायक्रोअल्गी नावाच्या सूक्ष्म वनस्पतीवर केंद्रित असलेल्या एका प्रकल्पात भाग घेतला.

त्यांनी या वनस्पतीचे नमुने गोळा करणे आणि ते जतन करण्याचे काम केले. या मायक्रोअल्गीमध्ये भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अन्न, ऑक्सिजन आणि इंधन पुरवण्याची क्षमता असू शकते. मानवाला पृथ्वीबाहेरील वातावरणात राहण्यासाठी या वनस्पती महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. अंतराळात स्नायूंचे होणारे नुकसान, मानसिक आरोग्य आणि अंतराळात धान्य रुजवण्यासारख्या प्रयोगांचा समावेश आहे. भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स ही अंतराळवीर ५ जून २०२४ रोजी अंतराळवीर बूच विल्मोर यांच्यासह अंतराळ स्थानकाकडे रवाना झाली होती. ती आठ दिवसांनी परतणार होती. मात्र तिचे परतीचे यान खराब झाले. त्यामुळे ती तिथे अडकली. अखेर नासाने एलन मस्कच्या ‘स्पेस एक्स’ची मदत घेतली आणि त्यांच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून २८६ दिवसांनी १८ मार्च २०२५ या दिवशी सुखरूप पृथ्वीवर परतली. या सा-या गोष्टींचा अनुभव इस्रोच्या वैज्ञानिकांना उपयोगी पडणार आहे. शुभांशू हे ‘गगनयान’साठी निवडलेल्या चार हवाईदल अधिका-यांपैकी एक आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा ‘इस्रो’ला होणार आहे, ज्यामुळे भारताच्या अंतराळ स्वप्नाला नवी दिशा मिळाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR