नांदेड : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी कर्जमाफी आणि वीज बिल माफ माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा देणारे ठरल्याचे सांगत, केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा विषय आता संपला असे उत्तर देत यावर पडदा टाकला. तर नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील युती ही केवळ सहकार क्षेत्राच्या हितासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील शेतकरी कल्याण, जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आणि स्थानिक राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले.
राज्य सरकारने शेतक-यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करत खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय योग्य वेळी हे निर्णय घेतले आहेत. शेतक-यांच्या ७.५ एचपीपर्यंतच्या कृषिपंपांचे वीज बिल पूर्णपणे शुन्य करण्यात आले आहे. तर कृषी क्षेत्रावरील सुमारे ४८ कोटी रुपयांची जुनी थकबाकी माफ करण्यात आली आहे.
अपुरा पाऊस, अल निनोच्या संकटात अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. हे सर्व निर्णय ऐतिहासिक असून यामुळे संकटग्रस्त शेतकरी वगार्ला मोठा आधार मिळाला आहे, असे त्यांनी नमूद केले. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर बोलताना खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले की, ही निवडणूक राजकीय स्वरूपाची नसून जिल्ह्याच्या व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आहे.
परस्पर संवाद टिकून राहावा आणि बँकेचे हित साधले जावे, यासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आम्ही एकत्र आलो आहोत. या समन्वयामुळेच ११ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत सर्वच जण चेअरमन आणि सभासद म्हणून एकत्र आले आहेत. स्थानिक पातळीवर सहकारासाठी झालेली ही युती असून याचा प्रत्यक्ष राजकारणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. नांदेड जिल्ह्याला जर मंत्रिमंडळात स्थान किंवा मंत्रीपद मिळाले, तर निश्चितच आनंदच होईल. परंतू मंत्रीपद नसल्याने जिल्ह्यात विकासाचा कोणताही बॅकलॉग किंवा गॅप राहिलेला नाही, सर्व कामे वेगाने सुरू आहेत.
















